गाठीचं गणित...

च्यायला, गाठ हे भलतंच कौशल्याचं कामै. आपण आर्ध आयुष्य एका साध्या गाठीवर काढलं. अगदी बुटाच्या लेसपासून पोते बांधण्यापर्यंत एकच एक गाठ. एक टोक इकडून धरा, दुसरं टोक दुस-या हातानं धरा. एकमेकांत गुंतवून दोन्ही बाजूला खेचा.... दुस-या वेळेसही तसंच; पण एका बाजूचं टोक फोल्ड करा, गाठ मारा. सोडायच्या वेळेस एक टोक धरून खेचलं की, ती सटकन सुटणार... बस्स!

खरं तर गाठ हे भलतंच कौशल्याचं आणि महेनतीचं कामै. केवढे त-हेत-हेचे प्रकारैत त्यात. या सुंदर गोष्टीकडे जास्तच दुर्लक्ष केलं याचा आता पश्ताताप होतोय. निरनिराळ्या वेळेस निमित्तानिमित्ताने भेटलेल्या गाठी जरा प्रेमाने न्याहाळायला पाहिजे होत्या. उकलून पाहायला पाहिजे होत्या. केवढी कला लपलीये त्यात.
.......

कपडे वाळत घालण्यासाठी वाड्यात मी एक नायलॉनची दोरी बांधली होती. तिचं एक टोक तात्पुरतं झाडाच्या फांदीला बांधलेलं होतं. ते सारखं निसटायचं. नंतर एकदा कामानिमित्त शेजारचा वॉचमन आला आणि त्याने ती बांधताना मला विचारले, बैलगाठ बांधू काय? मी हो म्हटलं.

झाड वाढलं तसं ती दोरी झाडाला काचू लागली. मग मी ती बैलगाठ सोडवायचा प्रयत्न केला; पण ती काही केल्या सुटेना. शेवटी कात्रीने दोरी कापली; पण तिचा जो फास होता, तो पक्का होता, झाडाची फांदी मोठी होत गेली आणि त्याने तो आपल्या आत ओढून घेतला. तेव्हा वाटलं होतं, मारण्यासाठी नाही तर किमान सोडवण्यासाठी का होईना गाठ मारणं शिकून घ्यायला पाहिजे होतं. आता अलिकडे वाटायला लागलंय की, नव्या काळात माणसाला निरनिराळ्या प्रकारच्या गाठी मारता यायलाच हव्यात. या अतिरिक्त स्किलची तीव्र गरज आहे.

शाळेत असताना दोन्ही पंजे समोरासमोर धरून अंगठ््यात आणि करंगळीत दोरा धरायचा, बाकी बोटांनी त्याची जाळी विणायची हे आम्ही करायचो; पण ती जाळी पुढे वाढवली पाहिजे, ते स्किल टिकवलं पाहिजे हे नाही कळालं कधी. त्याची आता रुखरुख लागून राहिली आहे.

आमचा एक मित्र एका जरा निराळ्या बुद्धिमत्तेविषयी सांगताना नेहमी असं म्हणतो की, ‘त्यानं पायाच्या करंगळीनं मारलेली गाठ भल्याभल्यांना दोन्ही हातांनी सोडवता येत नाही.’ तर या वाक्यातली गाठ मात्र रुपकात्मक आहे. ती सोडवणं हेही कौशल्याचं काम असतं, कारण त्यात कात्रीनं कापण्याचा पर्याय नसतो शिवाय गुंता वाढण्याची अधिक शक्यता असते!

(छायाचित्र: तर हे गाडगं सुरुवातीला असं फासात लटकवताच येईना, म्हणून मग गाठीचा गिल्ट दाटून आला होता; पण जमलं!)

टिप्पण्या