काजूकथलीवाले - सोनपापडीवाले!

बड्या मंडळींच्या कार्यात जेवणं म्हणजे खायचं काम नसतं. रसिकता जोपासायला तिथे जातिवंतच लागतात. खरं तर ती पण एक कला आहे. तिच्याकडे आपण फारसं लक्ष दिलं नाही किंवा महत्त्वाचं समजलं नाही. अशा ठिकाणी जेवायला काहींसा अभ्यास, बराचसा अनुभव आणि चौकस स्वभाव लागत असतो. तिथला नेमका आस्वाद घेणं हे कुणा ऐ-यागै-याचं काम नाही.
प्लेटांच्या टेबलावरनं एक प्लेट पेपरनॅपकीनसह उचलली, सॅलड वाढून घेतलं आणि रांगेला लागून जे दिसेल ते ताटात बचाबच घेत पुढे पुढे धकत राहिलं, कुठला तरी कोपरा गाठून मग प्लेटीतून हुडकून हुडकून त्याचे बकाबक घास घेतले म्हणजे झालं, असं नसतं. कुठं काय असतं, केव्हा काय घ्यायचं आणि काय टाळायचं यातलं कौशल्य ज्याच्यात असतं तो इथे ख-या अर्थाने तृप्त होतो. बाकीच्यांचे काय पोटं भरतात, एवढंच!
पूर्वी अशा बड्या माणसांपर्यंत आपली पोच नसायची. त्यामुळे निमंत्रणही नसायची. अलिकडच्या काळात आपल्यातलीच काही मंडळी बडी झालीयेत. मग आपोआपच ‘त्यांच्या कर्तृत्वाने’ अशा निमंत्रणात आपणही बसू लागलो आहोत. अशा बड्या नातलगांना, परिचितांना काजूकथलीवाले म्हणतात. बाकी आपल्यासारखे जे असतात ते सोनपापडीवाले. सणावाराच्या काळात येणा-या- वाटल्या जाणा-या मिठाईतून हा दर्जा ठरविण्यात आलेला असतो. तर प्रत्येकाच्या संपर्कात किंवा नात्यात एक का होईना काजूकथलीवाला हमखास असतोच असतो. ज्याच्या संपर्कात- नातलगांत यांचीच संख्या जास्त असते, तोही पुढे चालून काजूकथलीवाला होण्याच्या पायरीवर असतो, असे समजले जाते.
तर अशा मंडळींच्या कार्यात पायलीचे पन्नास पदार्थ असतात. एखाद्या पर्यटन क्षेत्राला भेट द्यावी, कुतूहलाने एकेक मूर्ती, स्थापत्त्य बघावे आणि तो सारा परिसर फिरून यावा, तसाच फिल आपल्याला त्या भागात फिरताना येत राहतो. कुठल्या कुठल्या नावाच्या कुठल्या कुठल्या पाट्या तिथे रोवलेल्या असतात. आपण ओझरतं वाचतो आणि सोडून देतो. अशाच एका अनाकलनीय नावाखाली आपल्याला चक्क बाजरीची भाकरी दिसते. कित्येक वर्षानंतर एखादा जिवश्च कंठश्च पाहुणा अनोळखी प्रदेशात अचानक भेटावा तसं आपल्याला वाटायला लागतं. त्याच रांगेत वांग्याची भाजीही असते. दोघेही आपल्याला भुरळ पाडतात.
.........
... तर मग पानबिन खाऊन आपण बाहेर पडतो. कुणीतरी विचारते आपल्याला, अमूक घेतलं काय, ते भारी होतं. तमूक घेतलं का ते फारच टेस्टी होतं. इटालियन फूड होतं, ते घेतलंत काय? स्वीटमध्ये काय खाल्लंत? बंगाली मिठाई तर अप्रतिम होती.... वगैरे वगैरे.
तर मग आपलं उत्तर असतं, छे तसलं इटालियन वगैरे काय आम्हाला नाय आवडत, स्वीटमध्ये तर आईसस्क्रीमशिवाय फार काही खातंच नाही, तुम्हाला माहितंच असेल. पोटाला आपलं भाजी भाकरी कधीही चांगली होे!
संधीवाचून चारित्र्यवान जसं असतं तसंच हे फूडमधलं, कळण्यावाचून स्वाभिमान!

टिप्पण्या