देवघरातले डॉक्टर....

गेली पन्नासेक वर्षे आमच्या घरात एका डॉक्टरांचं नाव कायम असतं, ते म्हणजे डॉ. डावळे. मला कळायला लागल्यापासून आईवडलांच्या तोंडी हे नाव मी सतत ऐकतोय, ते आजतागायत. अगदी कालपरवाही त्यांचा विषय झालाच. आम्हा भावंडांपैकी कुणीही त्यांना प्रत्यक्षात पाहिलेलं नाही, त्यांचा फोटोही कधी बघण्यात आलेला नाही; पण ते आम्हा सर्वांच्या मनात कायमसाठी मुक्कामाला आहेत.
सत्तरचा काळ. वडील आग्य्राला ट्रेनिंगला. आई तिथं आजारी पडली. आग्रा परकं गाव. तेथील डॉक्टर पेशंटला हलवायची परवानगी देईनात. स्वत:च्या जबाबदारीवर न्या; पण त्वरित अॅडमिट करा असा सल्ला त्यांनी दिला. वडिलांनी तिला कसंबसं परत आणलं. अंबाजोगाईला दाखवलं आणि तेथील पानसे डॉक्टरांनी काही दिवस उपचार केले आणि नंतर पुण्याला हलवायला सांगितलं. त्यासाठी पत्रही दिलं.
सेकंड ओपिनियन म्हणून तिला सोलापुरात दाखवलं. डॉक्टर म्हणाले, फार काही झालेलं नाही, औषधाने होतील ब-या. त्यांचा दिलासा मिळाला; पण तब्येत अधिकच बिघडत गेली, तेव्हा पुण्याला न्यायचं ठरलं.
पुण्यात औंधला छावणी परिसरात मोठं सरकारी इस्पितळ होतं. तिथे डॉ. डावळे होते. डॉ. पानसेंनी त्यांच्या नावाने पत्र दिलेलंच होतं. डॉ. डावळे वाटच पहात होते. पेशंटचं काय झालं म्हणून डॉ. पानसे फॉलोअप घेत होते. त्यावरनं डॉक्टरांनी आधी सगळ्यांना झापून काढलं. डॉक्टर काळजी करताहेत आणि तुम्ही खुशाल पेशंटला घेवून घरी बसलात म्हणून.
होतं असं की, आईला श्वसनाचा त्रास होत होता. तिच्या फुफ्फुसावर एक काळा डाग होता. त्याचं नेमकं निदान होत नव्हतं. तो मोठाही होत नव्हता. तपासणी झाल्यावर डॉक्टर म्हणाले, औषधोपचारांनी या वर्ष दोन वर्ष जगतीलही; पण ऑपरेशन केलं आणि ते जर सक्सेस झालं तर पुढच्या किमान पस्तीस वर्षाची गॅरंटी मी देतो.
वडिलांचा निर्णय होण्यापूर्वी डॉक्टरांनी थेट आईला विचारलं, ‘तुझं करायचं का गं ऑपरेशन, मुलांना बोलावून घ्यायचं काय? त्यांना बघायचंय का तुला?’
ती म्हणाली, ‘नको बोलवायला आणि मी अशी नाही जगणार. मला करायचंय ऑपरेशन. माझं काही झालं तर पोरांना बघायला माझ्या बहिणी आहेत. त्या बघून घेतील.’
एका मावशीचे मिस्टर, छत्रपतीकाका या काळात कायम वडलांसोबत असत. अंबाजोगाईपासूनच्या निर्णयात त्यांचा सहभाग होता. आईची तब्येत आधीच तोळामासा. निर्णय घेणं अवघड होतं. काय होईल सांगता येत नव्हतं. शेवटी निर्णय झाला.
पण रक्ताचा तुटवडा होता शिवाय तिच्याही अंगात रक्त कमी. दवाखान्याच्या परिसरातच एक बांधकाम चालू होतं. तिथे अनेक मजूर होते. रक्त द्यायला त्यांनी तयारी दर्शवली. मग झालंही ऑपरेशन. तिच्या फुफ्फूसाचा खालचा एक घोस काढण्यात आला. रक्त देणा-या त्या मजुरांच्या नावाची यादी पुढे कित्येक वर्ष वडिलांनी जपून ठेवली होती, नंतर शिफ्टींगच्या काळात ती गहाळ झाली.
डॉक्टरांनी वडिलांना एक बजावून सांगितलं होतं, ‘तिला नोकरी सोडू देवू नका. काही दिवस आरामानंतर परत जॉईन व्हायला सांगा. तिचं आयुष्य वाढेल.’
........
त्या घटनेला आता पन्नासेक वर्ष होतील. डॉक्टर फार पूर्वीच गेले. अलिकडे काही कारणासाठी कुठल्या डॉक्टरांकडे जायचं म्हटलं की, आईचं ठरलेलं एक वाक्य असतं, डॉक्टरांंनी दिलेली ३५ वर्षांची मुदत संपूनही पंधरा वर्ष लोटलीत. तेव्हाचे तुम्ही तान्हुले आता म्हातारे होवू लागला आहात. बस्स झालं आता.
.....
ऑपरेशननंतर ज्या मावशीकडे आई महिनाभर राहिली ती बेबीमावशी मात्र त्यानंतर दोनतीन वर्षातच अकाली गेली. तिची एक फोटो फ्रेम आईने करवून घेतली होती. तिच्या प्रत्येक नोकरीच्या गावी ती भिंतीवर लावलेली असे.
काळ बदलला असला तरी खोलवर असलेल्या जाणीवेची गोष्ट माणसाला अधिक हळवं करत असावी. मला बांधकामावरचे मजूर पाहिले की, रक्त देणारे ते मजूर आठवतात, डॉक्टरांत आई दिसते. आईत डॉ. डावळे दिसतात.
अशा तमाम डॉक्टरांना डॉक्टर्स डेच्या निमित्ताने नमन!

टिप्पण्या