मरण घराचं

घरांना नसतं झट की पट मरणाचं सुख
आधी घरातली माणसं परागंदा होतात. त्यांच्या परतण्याची वाट पाहता पाहता मग एकाकी घराचा धीर सुटू लागतो. त्याच्या भिंती हळूहळू ढासळू लागतात. छत खाली उतरू लागतं. एव्हाना जपून राहिलेले घराचे नाजूक कोपरे मग उघड्यावर येवू लागतात. उंदराघुशींची बिळघरे फोफावू लागतात. त्यांच्या मागावर सळसळ येते, दगडांच्या पसाऱ्यात फणा काढून बसते. पडून गेलेल्या पावसाचा ओलावा पकडून खुरटलेल्या झाडाझुडपांचं रान माजतं.
एकेक अवयव निकामी होत असताना, दूरदेशी गेलेल्या आप्ताची वाट पहात खाटेवर पडून राहिलेल्या जर्जर वृद्धासारखं घर तगून राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतं. ना त्याला समूळ मरता येतं ना जगता येतं, कणाकणाने वर्षानुवर्ष रोज मरतं ते माणसावाचून घरंच!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा