पाच पलंगांची गोष्ट!

लोखंडी पलंग जावून लाकडी दिवाण मध्यमवर्गियांच्या घरात शिरू लागल्याचा तो काळ. दोनच जण मावणारा; पण तीनजण बसण्याचा दावा करणारा सोफा आणि त्याचे दोन सिंगल सहकारी यांचाही ट्रेंड जोमात होता.
तर घरात एक पलंग होता, बैठकीत मांडलेला. एवढी वर्ष इमानेइतबारे राहिलेला. नव्या ट्रेंडमुळे तो हळूहळू डोळ्यांना खूपू लागला. त्याच्या दोन बाजूचे कठडे तर जास्तच डाचू लागले. दिवाणाचे पाय कसे भक्कम असतात, त्या तुलनेच याचे पाय अगदीच मरतुकडे.
तर तो खटकायचा; तर मग एक उपाय शोधला आणि तो अंमलातही आणला.
दोनतीन दिवसांसाठी घरातली सगळी मंडळी बाहेर गावी गेली होती. तीच संधी साधून मग एक हॅकसॉ विकत आणली आणि पलंगाच्या दोन्ही बाजूचे कठडे पहिल्यांदा कापून टाकले. मग तो प्लेन झाला. तरीही त्याला दिवाणचा लूक आलाच नाही. तो भलताच उंच दिसायला लागला. मग त्याचे पायही थोडेथोडे कापले. मग त्यावर गादी आणि मोठी चादर टाकली. लोंबलेल्या चादरीमागे त्याचे पाय लपून गेले.
बस्स, झाला दिवाण. छोट्याशा बैठकीत तो उठून दिसू लागला. परिणामी कुणी काही बोललं नाही. मग अजून एक होताच दुसरा. त्याला तरी कशाला सोडा. राजरोस त्याचेही हातपाय कापून काढले. स्वत:वरच खुश व्हायचे ते सुखाचे दिवस. मग एका मित्राकडेही दिसला पलंग. त्यालाही सांगितली आयडिया. म्हटलं, करायचा असेल तर सांग, माझ्याकडे हॅकसॉ आहे. मी मदत करतो. तर मग त्याच्याकडचाही पलंग असा कापण्यात आला.
......
काही वर्ष गेली. पुढे लग्न झालं आणि सासूरवाडीत दोन पलंग दिसले. पहिल्या काही दिवसांतच तिकडे ज्या काय चकरा झाल्या, तेव्हाच हात शिवशिवू लागले होते. पहिल्या सहा महिन्यांत जरा भीड चेपल्यावर सासूबाईंना म्हटलं, पलंगाचा दिवाण करू काय? त्यांनी पहिल्यांदा काहीच उत्तर दिलं नाही; पण कशाला जावयाला नाराज करा म्हणून विरोधही केला नाही. त्या म्हणाल्या, फक्त दार लावून घ्या. शेजारपाजारचे बघतील, जावयाला कामाला लावलं म्हणून उगाच चर्चेला कारण नको.
लगोलग उत्साहात बाजारात जावून हॅकसॉ विकत आणली आणि वरच्या मजल्यावर काम सुरू केलं. दोन दिवसांत दोन्ही पलंग कापल्यावरच थांबलो. दोन्ही पलंग दोन भिंतीला काटकोनात लावून ठेवले. त्यावर बॉक्सच्या दोन दोन गाद्या टाकल्या. ते भलतेच छान दिसू लागले. अगदी खोलीच उजळून निघाली. मेहनतीला फळ आलं.
अनायासे दुस-या दिवशी त्यांच्याकडे काही नातलग आले. त्यांनाही ती बदललेली रचना भारी वाटली. मग कुणी पलंगावर बसले. मी आपलं खाली भारतीय बैठक टाकून बसलेलो. गप्पांत पाचदहा मिनीटांचा वेळ गेला. नंतर अचानकच एका पलंगावर मांडी घालून टेकून बसलेल्या दोघातिघांत अस्वस्थ हालचाल दिसू लागली. क्षणभरात तो पलंग स्लोमोशनमध्ये मधोमध फोल्ड होत गेला. त्यांना काय करावं कळेचना. तोल जावून दरीत घसरल्यागत ते त्या वळचणीत घसरू लागले. त्यांना पायही खाली टेकवता येईनात. दोनतीन लेकरांना एकाच झोळीत कोंबावं तसं काहीसं त्यांचं झालं. कसेबसे ते त्यातून बाहेर निघाले. सासूबाईंनी माझ्याकडे पाहिलं, मी बायकोकडे पाहिलं, बायकोने तिच्या आईकडे पाहिलं. त्यांना जावयाचा प्रताप सांगताही येईना आणि चिडताही येईना.
दुसNया दिवशी त्या पलंगाच्या फेगड्या पायाला कुठून कुठून दो-या बांधून त्याचा समतोल राखण्याचा मी भरपूर प्रयत्न केला; पण त्यातल्या एकानं राम म्हटला ते म्हटलाच. दुसरा मात्र तगून राहिला; पण त्यावर मांडी घालून आरामात बसायची कुणी कधी हिंमत केली नाही. तो अक्षरश: टेकायपुरताच उरला!
तर सांगायचं कारण, या पाच पलंगातलं आता कुणीच मूळ प्रवाहात राहिलेलं नाहीयेय. मित्राच्या बायकोने त्यांचा लपकलेला पलंग बाराच्या भावात भंगारात विकून टाकला. सासूबाईंनीही तेच केलं. वडिलांनी त्यांच्याकडच्या पलंगाला घरातून बाहेर काढलं आणि कायमसाठी ओट्यावरच्या एका सुरक्षित कोप-यात स्थान दिलं. तो जरासा वाकलाये; पण टिकूनै.
पाचवा जो आहे तो फोटोत दिसतोय. तोही मधल्या बाजूने जरासा लपकलाये. त्याला गोधड्यांचे वटकण लावून गादी टाकली की, तो प्लेन दिसतो; पण सांप्रतकाळी अडगळीच्या खोलीत काहीबाही अंगावर घेवून तो बसून असतोे. मध्यंतरी एका वॉचमनने त्याच्या बायकोच्या बाळंतपणासाठी तो नेला होता, महिनाभराने परत आणून दिलाये.
त्याला भंगारात टाकावं वाटत नाही. कारण कापाकापीचा पहिला प्रयोग त्याच्यावरच केला होता, म्हणून तोच खरे प्रेरणास्थान आणि मूळ पुरुषै. शिवाय त्या काळात केवढी मेहनत करावी लागली होती लोखंड कापायला. भलेही पुढचे प्रयोग यशस्वी झाले नसतील; पण त्या सरावाने आपण लोखंड कापू शकतो याचा विश्वास तर दिला.

टिप्पण्या