एक चिचुंद्री मनातली!

पालापाचोळा वाढलाये म्हणून आता कंपोस्टसाठी मोठी सिमेंटची टाकी केलीये. तीही जवळपास भरत आलीये. तिच्यावर मोठं रेग्झीन झाकलंय.
टाकीतला मालमसाला अधूनमधून खालीवर करावा लागतो. तर एकेदिवशी त्यासाठी रेग्झीन काढलं आणि कचऱ्यात काठी खुपसली तर पानाच्या गचपणातून एक चिंचुद्री बाहेर आली. दचकलो, बाजूला झालो. डोळे मिचकावत तिने टाकीला गोल प्रदक्षिणा मारली आणि खाली उतरत, भिंतीच्या कोपऱ्या कोपऱ्यानं धिम्या चालीने निघून गेली. वाड्यात एका बाजूला भलं मोठं भगदाड केलंय तिच्या कुटुंबाने. त्यात ती शिरली. मी तिच्याकडे नुसताच बघत राहिलो.
ही मंडळी भलतीच तापदायक. ड्रेनेज लाईनच्या पट्ट्यात फरशा पोकळ केल्यायेत त्यांनी. एके ठिकाणी तर बदकन खाली गेलीये फरशी. पाचसहा वर्षापूर्वी काचाबिचा घालून त्यांचा बंदोबस्त केला होता. आता पुन्हा नव्याने कष्टपूर्वक आणि कलात्मकरित्या बिळं बांधून काढलीयेत त्यांनी. एकीकडे लिंपलं की दुसरीकडे कुठेतरी ते दिसतच राहतं.
तर नंतरच्या दिवशी मी पुन्हा एकदा कंपोस्टचं मटेरियल हलवायला गेलो. दचकतच रेग्झीन बाजूला केलं. ती दिसलीच. टाकी उघडी झाल्याने तिने लगेच काढता पाय घेतला. पूर्वीसारखी डोळे मिचकावत कलाकलाने निघून गेली. खरं तर तिला आणि तिच्या खानदानाला वाड्यातून हाकलून लावायचंय, त्यांचा कायमचा बंदोबस्त करायचाय; पण तूर्त तिच्या एकटीचा पाठलाग करायला मन धजावलं नाही. बरं, एरवी राजरोस पक्षी मारणारं बेट्याचं मांजरही अशा वेळेला आपल्या मदतीला येत नाही. पापात भागीदार होत नाही.
तर ही गोष्ट बऱ्याचदा रिपीट झाली. आमच्या वेळा बरोबर जुळून येत होत्या. तिची भेट न चुकता व्हायचीच. तिचं डोळे मिचकावून जाणंही तसंच. तर मागच्या आठवड्यात कचरा खालीवर करत असताना, मी सावध उभा होतो. आपली चाहूल लागली की, ही बया टुनकन उडी मारेल म्हणून वाट बघू लागलो तर तिथे हालचालच नाही. त्या दिवसानंतर नाही आणि त्यानंतरही नाही. मग उगाच अस्वस्थ व्हायला लागलं.
च्यायला, चिचुंंद्री ही काय सवय होण्याची गोष्टै काय?
एखाद्याची सवय झाली, गृहित धरलं आणि ते गायब झालं की, सुन्न वाटायला चिचुंंद्री काय माणूसै काय? असा प्रश्न पडू शकतो; पण वाटलं सुन्न, काय करणार. कदाचित तिने वेळ बदललेली असणार किंवा काही दिवसांनी पुन्हा येईलही ती, काय सांगावं!
.......
काही वर्षांपूर्वी एकदा घुशीनं हीच बाजू पोकळ केली होती. तिच्या बिळाचा माग काढत काढत उकरत गेलो तर ते सांडपाण्याच्या चेंबरपर्यंत गेलं होतं. मग मिस्त्रीने चेंबर उघडलं. तर पाईपमधून घुशीच्या पिल्ल्यानं रोखून पाहिलं. अगदी काही सेकंंदच. माझी आणि त्याची नजरानजर झाली. थेट डोळ्यात डोळे. काय दिसत होतं ते, बापरे. अगदी आंघोळबिंगोळ करून भांगबिंग पाडून आल्यागत, स्वच्छ काळं देखणं. डोळे पाणीदार आणि बोलके. त्यांच्यातल्या तारुण्याच्या उंबरठ्यावरचा तो किंवा ती असावी ते. ते डोळे कायम माझ्या स्मरणातैत. तेच डोळे चिचुंद्रीला जीवदान देताहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा