ठेवणीतला गालिचा

संक्रांत, दसरा, पाडवा वगैरे तत्सम सणादिवशी एका गोष्टीचं भलं कौतुक होतं तेव्हा. त्यादिवशी पत्र्याची ट्रंक उघडली जायची आणि त्यातून एक गालिचा बाहेर काढला जायचा. त्याचं ते दिसणं, गोष्टीत वाचलेल्या जादूच्या गालिच्यागत वाटायचं. तेवढे सणाचे दिवसच तो अंथरलेला दिसायचा, नंतर तो कधीच दृष्टीस पडायचा नाही. फार झालं तर लग्नाची वगैरे एखादी बैठक असेल तरच. तर हे सणवार आले की, आदल्या दिवशीपासूनच सुरू व्हायचं, ‘चला चला, गालिचा अंथरायचा दिवस आला.’
कित्येक दिवस घडी घालून ठेवल्याने त्यावर टोकदार रेघा दिसायच्या. त्या त्याला मध्येच टेकाडं आणायच्या. मग तो गुडघ्यात वाकल्यागत वाटायचा. जरा इस्त्री फिरवली की त्याचे टेकाडे अंतर्धान पावायचे.
दीडदोन खोल्यांचं ते घर; पण त्या गालिच्यामुळे सिनेमातल्या महालागत वाटायचं. उजळून निघायचं.
केवढा दीर्घायुष्यी होता तो गालिच्या. कितीतरी वर्ष टिकला. त्या पिवळसर गालीच्यावर वाघाचं डिझाईन होतं. वाघ चमकायचा. त्याच्या अंगावर लोळायला मस्त वाटायचं. गालिचे आता एकापेक्षा एक आले आहेत. ते रोजच पथारी पसरून असतात; पण त्याचं अप्रूप आता राहिलं नाही.
...
महालक्ष्मीसाठीचा रेशमी गालिचा तर भलताच व्हीआयपी, त्याचं दर्शन वर्षातून एकदाच!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा