गाण्यात अडकतो जीव...
गावाकडे गेलं की, दोन दिवस गप्पाटप्पा होतात. इकडची तिकडची ख्यालीखुशाली होते. दोन दिवसानंतर वडिल त्यांच्या नाट्यगीतात रमून जातात. आपणही ऐकतो थोडं त्यांच्यासोबत. मानही डोलावतो. एरवी ‘वद जावू कुणाला शरण...’ च्या पुढे दुसरं काही आपल्या ओळखीत नसतंच. तिथंच आपली गाडी थांबलेली असते.
गावाकडून आपण परत येतो, मुलगा सुटट्यांसाठी आलेला असतो. मग दोन दिवस गप्पाटप्पात जातात. इकडची तिकडची ख्यालीखुशाली होते. तिस-या दिवशी त्याचे हेडफोन बाहेर निघतात, चौथ्या दिवशी तो आपल्यालाही त्याच्या आनंदात सहभागी करू पाहतो. हेडफोन आत ठेवून स्पीकर वाढवतो. आपल्या कळण्यापलिकडचं लाऊड असं काही तरी चालू असतं. तो जगातला ‘बाप बँडै’ एवढं आपल्याला सांगितलं जातं. आपण ऐकतो; पण त्यानेच कधीकाळी ऐकवलेल्या ‘स्टेअर वे टू हेवन’ पासून आपली गाडी अजून पुढे धकलेली नसते.
गावाकडं आपण मान डोलावलेली असते इथं आपण हेडबँग बघत असतो.
ज्या कर्तव्यभावनेने आणि तन्मयतेने आपण नाट्यगीते ऐकतो अगदी त्याच कर्तव्यभावनेने आणि तन्मयतेने आपण बँडही ऐकतो. दोन्ही वेळेस आपल्या आत कुठेच हालचाल नसते. आपल्यात असते ती शांतताच. पेटी असो की गिटार बिलकुलच तोल ढळू द्यायचा नाही, एवढी स्थितप्रज्ञता नव्या काळात आपल्यातच असावी.
मुलाचे बँड ऐकताना फक्त एक असूरी आनंद असतो. तो आपल्याला एकट्याला ऐकावा लागत नाही. त्याला आईही हवी असते. ते भयानक मेटल ऐकताना सुगमवाल्या आईची जी अवस्था होते, ती आपल्याला प्रचंड आनंद देवून जात असते. गाण्याचं व्हायचं ते होईल; पण आपला सूड परस्पर उगवला गेलेला असतो.
कारण,
घरात रेडिओवर अमूक एखादं गाणं चालू असतं त्यावेळी आपल्याला अचानक विचारलं जातं, ‘हे गाणं त्या अमूक सिनेमातलं आहे ना, तो तमूक हिरो होता, नंतर तो मरतो बघा...’ आपण विचार करायला लागतो तोच कुटूंब स्वत:शीच पुटपुटतं, ‘मी पण कोणाला विचारतेय!’ या नंतरच्या वाक्यावर विचार करणारे आपले हात डोक्यावरनं खटकन खाली येतात.
बरं हा संवाद एखाद्या वेळी झालेला असेल तर ठिकै. पण नाही, तो खूपदा होतो. तुमची खात्रीयेय ना, समोरच्याला गाण्यातलं फार काही कळत नाही, तर मग दरवेळी विचारायचं कशाला? बरं विचारलं तर पुन्हा, ‘मी पण कोणाला विचारतेय’ असे हताश उद्गार काढायचे कशाला?
.......
नाही दिलं देवानं आम्हाला गाण्याचं अंग, पण एक ध्यानात असू द्या, कानठार माणसेच कानठळ्याचा मुकाबला करू शकतात.
सध्याचे दिवस अपरिहार्य कानठळ्यांचे आहेत!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा