लॉकडाऊन आणि मोबाईल - २
भले चंद्रता-याचे वचनं तुम्ही परस्परांना दिलेले असोत. शेवटापर्यंत एकत्रच जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतलेल्या असोत; पण तुम्हाला सांगतो, हे असं असलं तरी लॉकडाऊनच्या काळात आपला मोबाईल कुणी कुणाला देत नाही!
पहिले काही दिवस दोनेक तास दयेपोटी दिला जातो; पण जसे दिवस लोटतात तशी त्यातली दया दुर्लक्षात रुपांतरीच व्हायला लागते. बघा, ट्राय करून. फोन बंद पडणे ही नियतीने दिलेली संधी असते, खात्री करून घेण्याची. खूप गोष्टी शिकतो माणूस यातून.
तर मर्यादित वेळेसाठी तुमच्याकडे मोबाईल येतो तेव्हा दुस-याच्या मोबाईलवरनं तिस-याला स्माईली देणं, बदाम देणं, लाईक करणं केवढं कठीण असतं ते कळतं माणसाला. एरवी तर वर्षाव करू शकतो आपण; पण या काळात तेवढाही वेळ खर्ची घालणं जिवावर येतं.
घरात कुणी पेंगुळल्याचं नजरेस आलं की, तुम्ही त्याच्याभोवती घुटमळता. पाच दहा मिनिटात तो झोपेलच आणि त्याचा मोबाईल मिळेल या खात्रीने पुस्तक घेवून तुम्ही त्याच्या नजरेच्या टप्प्यात बसता; पण दुर्दैव तुमची पाठ सोडत नाही, कारण नेमकी तुम्हाला झोप लागून जाते. ते फारच अस्वस्थ करणारं असतं.
तुम्ही बिनामोबाईलचे खुर्चीत मुटकुळं करून बसलेले असता, तेव्हा तुमच्या चेह-यावर चिंतकाचे भाव असतात. या काळात बिनामोबाईलवाला माणूस हा प्रदर्शनीय असतो, तो माणसात गणला जात नसतो. जणू त्याला शेपटी फुटलेली असते.
अशा चिंतनाच्या काळात इतर मंडळी जेव्हा आपापल्या मोबाईलमध्ये बघत, आजची अमूक अमूक पोस्ट भारीये वगैरे जाहीर जहरी बोलत असतात, त्या काळात आपल्याला होणा-या वेदना विलक्षण टोकदार असतात.
तुम्हाला त्वरित व्यक्त व्हायला माध्यम नसतं, कुणाचं वाचून लगेच मत मांडता येत नसतं. तुम्हाला काहीच प्रुव्ह करता येत नसल्याने इतर पोस्टचं कौतुक गपगुमानं ऐकावं लागतं, फारच अंगावर येणा-या गोष्टी असतात या.
माणूस फार हतबल असतो कधीकधी!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा