शिकरणाची गोष्ट....

नेहमीच्या खाण्यातल्या काही पदार्थांना अचानकच एखादी गोष्ट जोडली जाते आणि नंतर तो पदार्थ जेव्हा केव्हा आपल्याकडे होईल तेव्हा तेव्हा ती गोष्ट त्याच्यासोबत आठवून येतेच. ब-याच जणांच्या आठवणी अशा पदार्थांच्या निमित्ताने घटनांशी, माणसांशी बांधल्या गेलेल्या असतात. पदार्थ हा व्यक्तिपरत्वे असतो, ते अनेकही असू शकतात. अगदी नॉनव्हेजपासून शिकरणापर्यंत. तूर्त शिकरणाशी जोडलेली गोष्ट.
मध्यंतरी एका पुतण्याचं लग्न झालं. माझ्यातल्या सास-याला मग पत्र लिहायची हुक्की आली. मी लिहिलं त्या नव्या सुनेला पत्र. तिचा नवरा, तिची नणंद, सासू, सासरे कसे आहेत वगैरे गमती जमती होत्या त्यात.
फार पूर्वी त्या भावाच्या घरी मी ब-याचदा जायचो. नेमकं मी गेलेलो असलो की त्यांच्याकडे शिकरण केलेलं असायचं. मग दरवेळी मी म्हणायचो, वहिनी, शिकरणाने त्वचा रोग होतो असं ऐकलंय बरं मी. फार नका करत जावू. पण त्याने काही फरक पडायचा नाही. पुन्हा कधी गेलं की, ते हमखास असायचंच. तर त्या शिकरणावर संदर्भटोमणे होते पत्रात.
....
दुस-या दिवशी संध्याकाळी घराची बेल वाजली म्हणून दार उघडलं तर ती नवी सून, पुतण्या आणि पुतणी दारात. त्यांच्या हातात भला मोठा गिफ्टपॅकचा बॉक्स. तिघांनी मग आमच्या हातात तो बॉक्स ठेवला आणि नमस्कार केला. आहेराचं देणंघेणं आधीच पार पडलं होतं, आता हे काय नवीन असावं? मग त्यांच्या उपस्थितीतच आम्ही ते उघडून बघितलं तर त्यात भला मोठा डबा आणि त्यात एवढं मोठं शिकरण. ते शिकरण संपवता संपवता नंतर आमच्या आख्ख्या कुटुंबाला नाकीनऊ आले.
.....
ही अनोखी; पण हलके चिमटे काढणारी दाद असते. त्यासाठी समोरच्याला कुटाणेही करावे लागतात. केळी आणा, शिकरण करा, गिफ्ट पॅक करा, नेऊन द्या वगैरे केवढ्या तरी भानगडी. त्यांनी कष्टपूर्वक दिलेली ही दाद सहजासहजी नाही विसरायची. त्याचं रिटर्न गिफ्ट कधी ना कधी द्यावं लागतच असतंय. तसा अलिखित नियम असतो. कधीतरी आपल्या हातात राज्य आलं की, आपल्यालाही ही संधी असतेच; फक्त कुटाण्याची तयारी असावी लागते, एवढंच!
हे कौटुंबिक चिमटे निखळ आणि नितळ नातेसंबंधासाठी पोषक असतात!
...
जाता जाता:
केळाच्या चकत्या करून, त्यात पिठी साखर घातलेलं शिकरण मला भलतंच नाटकी वाटतं, तुलनेत मस्तपैकी हातानं कुस्करलेलं आणि त्यात नेहमीची साखर घातलेलं शिकरण नंबर वन लागतंय. साखर अशी अर्धवट विरघळलेली पाहिजे. तिनं केळाच्या लगद्याला आपलं सर्वस्व अर्पण करतानाच अस्तित्वाच्या खुणाही ठेवल्या पाहिजेत, बस्स. शिकरण आपलं वशिकरणच करतंय.
.....
त्यांच्याकडे आता शिकरण होतं का नाही माहीत नाही; पण आमच्याकडेही ब-याच दिवसात झालं नाही म्हणून हे सगळं आठवलं!

टिप्पण्या