डोंबाचं सृजन

स्मशान होतं. अंत्ययात्रा आली. डोंब आला. त्याने सरण रचायला सुरूवात केली. इकडे तिरडी खाली ठेवण्यात आली. मग मृतदेह उचलून सरणावर ठेवण्यात आला.
डोंबाने तिरडी उकलली. कडबा एका बाजूला टाकला. दोन मोठे बांबू बाजूला करून एकाला एक जोडून ठेवले. चिता जळत राहिली. कवटी फुटली. लोक निघून गेले. गोष्ट संपली!
......
स्मशानाच्या एका कोप-यात त्या डोंबाचं घर होतं. आजूबाजूला मोठमोठाली सुस्त झाडं. त्यात ब-यापैकी झाकून गेलेला त्याचा परिसर. अगदी लक्षपूर्वक बघितलं की, त्याच्या अंगणात लावलेली हिरवळ दिसत होती. तिथेच आळे करून त्याने काही रोपं लावली होती. त्या आळ्यांभोवती त्याने सुबक कुंपणही केलं होतं. बाजूच्या एका झाडाचा आधार घेवून मांडव टाकलेला होता. त्यावर गच्च वेल चढलेला होता आणि त्याला कारले लटकलेले दिसत होते.
कुंपणाच्या देखणेपणासाठी आणि वेलांच्या मांडवासाठी वापरलेला बांबू आणि त्याने काही वेळापूर्वी बाजूला लावून ठेवलेला तिरडीचा बांबू मला एकत्रित आठवले.
भावनेच्या पलिकडे जावून माणूस केवढा प्रॅक्टिकल असू शकतो. केवढं ते तटस्थ होणं, वास्तवाचा स्वीकार करणं. अशा बांबूचा मांडव करण्याची आणि त्यावर फळभाजांचा वेल चढवण्याची ताकद अशाच माणसात असू शकते. त्याच्यातल्या सृजनाला नमन!

टिप्पण्या