तुम्ही खंडोबा गल्लीत राहात होता का हो?

ऐकलं मी परवा एकाने दुस-याला विचारतांना. माणसांच्या संवादातले असे प्रश्न मला फार जिव्हाळ्याचे आणि आतड्यातले वाटतात. हे विचारताना त्या चेह-यावर उत्कंठा असते. आपला अंदाज खरा ठरावा, यांच्या ओळखीतल्या कुणाची तरी आपली ओळख निघावी, हे भाव त्या चेह-यावर सहज वाचता येतात. मी नाही राहिलो या नावाच्या गल्लीत; पण तत्सम नावाच्या गल्ल्या ही मला आपली खरी ओळख वाटते. मी मोठ्या शहरातली चाळ पाहिली नाही; पण त्याबद्दल वाचनात बरंच आलंय. त्यावरनं असं वाटतं की, गल्ली ही जागेअभावी शहरात जावून चाळ बनते. किंवा चाळीकडे जमीन असली की, त्याची गल्ली बनते. तोच रागलोभ, तेच मैत्र आणि तशीच सारकीवारकी आर्थिक स्थिती.

मी आयुष्यात पहिल्यांदा पत्ता लिहायला सुरुवात केली तेव्हा, म्हणजे प्राथमिक शाळेत असताना माझा पत्ता होता, ‘पत्की यांचा वाडा, चांभार गल्ली, कथले चौक....’ नंतर गाव बदललं, तालुक्यातून खेड्यात राहायला आलो. जिथे पत्त्याचं काहीच काम नव्हतं. फार काही टपाल येतही नव्हतं आणि आलंही एखादं तर नुसत्या नावागावावरही सहज मिळायचं. शेजारच्या घरातच पोस्ट कम घर होतं, पोस्टमास्तरचा पोरगा माझा क्लासमेट होता. त्यांच्या कुटुंबातच माझा आर्धा दिवस जात होता. एखाद्या नातलगाला आम्हाला पत्र टाकायची हुक्की आलीच आणि संपूर्ण पत्ता लिहावा वाटलाच तर तो, पोष्टाशेजारी, लिंबाच्या झाडाजवळ ... असा टाके. आमच्या दारात लिंबाचं मोठं झाड होतं.

शाळेच्या गृहपाठात पत्रलेखन असलं की, त्यातल्या पत्त्यात गल्ली लिहिण्यासाठी माझे हात शिवशिवायचे. त्याचं दुसरंही एक कारण होतं. माझं च हे अक्षर चांगलं यायचं आणि गल्ली शब्द लिहायला मला मजा वाटायची. लिहून बघा, भलतं भारी वाटतं. गर्रकन ग निघतो आणि मग डबल ल्ल, त्याला वेलांटी, आहाहा. ...तर जुन्या पत्त्यातली चांभार गल्ली अशी आत शिरून बसली होती.

नंतर कितीही गावं, घरं बदलली तरी कळायला लागल्यानंतरचं पहिलं घर अधिक दाट असतं आठवणीत. मला तर वाड्याचं मोठं दार, उंबरा, तिथला नळ, सगळे भाडेकरू, वाड्यासमोरचा उकिरडा, तिथलं गाढव, नाली, घरासमोरून नदीकडे जाणारा रस्ता, दोन चौक सोडून असणारा हापसा, पाच पैशांचे नाणे चिटकवून त्याचा बंगला बनवणा-याचं कोप-यावरचं दुकान आणि तिथं येणारा विशिष्ट वास हे जसंच्या आठवतं. तर ती चांभार गल्ली आयुष्यभरासाठी मनात वस्तीला आहे.

गावाकडून नंतर मात्र पुन्हा तालुक्यात राहायला गेलो तेव्हाचा पत्ता ‘घर नंबर ६, विनायक कॉलनी’ होता. तात्पर्य पत्त्यातून गल्ली शब्द हद्दपार झाला होता. ‘कॉलनी’ लिहिताना काही तरी हरवल्यासारखं वाटत राहायचं. पण तोही नंतर रुटीनचा भाग झाला. एवढा की, पुढे ते गाव सुटून अनेक वर्ष झाली तरी, कागदावर सहज काहीतरी खरडताना ‘विनायक कॉलनी...’ असं नकळत लिहिलं जायचं.

माझ्या आताच्या पत्त्यात गल्ली नाहीयेय, कॉलनी नाहीयेय. घराचं नाव, प्लॉट नंबर आणि अमूक नगर एवढ्यावर टपाल येतं. ही नावात नगर असलेली कॉलनी भरपूर मोठी असल्याने त्यात भाग पाडले आहेत; सहावी गल्ली वगैरे. त्याचा सहसा पत्त्यात कुणी वापर करत नाही. नाव नसलेली, निव्वळ नंबरावर ओळखली जाणारी गल्ली बिनचेह-याची असते. ती नाकीडोळी डावी वाटते, तिच्यात तेवढा जिव्हाळा जाणवत नसतो, जो खंडोबा गल्ली वगैरे नावात असतो. क्रमांक असलेली गल्ली ही फक्त सोय असते. नाव असलेली गल्ली केवळ सोयीची गोष्ट नसते, ती जगण्याची पद्धत असते.
.......

अमूक अपार्टमेंट, तमूक आर्केड, अमूक गार्डन, तमूक कॉलनी, अमूक नगर, तमूक पार्क आणि असं अजून बरंच काही काही असतं, त्या अनोळखी जगात गल्ली ही आपल्याला माय वाटते. ती असते!

टिप्पण्या