इजळलेला आंबा आणि अंठरलेल्या फोडी!

काही झाडांचा जन्म नारळ म्हणून होणार असतो; पण ऐनवेळी काहीतरी गडबड होते आणि त्याला आंब्याच्या जन्माला जावं लागतं. खरं तर पूर्वसूचनेनुसार नारळाच्या झाडाची आर्धी लक्षणं त्याने आत्मसात केलेलीही असतात.
याचा बदला म्हणून यातली काही झाडं गर्र्द हिरवा, आंबटढ्याण रंग धारण करतात, जेणे की त्यांच्याकडे पाहता क्षणी समस्त मानवजातीचे दात आंबावेत. करकर वाजावेत.
होतंही तसंच. मग त्या दिसण्यावरनं त्यांची रवानगी थेट बाजारात लोणच्याच्या कै-या म्हणून केली जाते. इथून त्यांचा सूडाचा प्रवास सुरू होतो. त्यांच्यातला राग धुमसत असतो. बस्स, आता गि-हाईक मिळण्याची वाट असते. आपली नियुक्ती असतेच त्यासाठी. त्यांना यथोचित घरी आणून आंबलेल्या दाताने आणि मिचमिच्या डोळ्याने आपण त्यांचे कचाकच तुकडे करतो. आपला वेग जोरावर असतो... आणि काही वेळात आपल्या लक्षात येतं की, आपले दात आंबतच नाहीतैत. डोळ्यांवर विश्वास ठेवून आपण उगाच करकर करतोय, स्पर्शात तर बिलकुलच खरखर नाहीयेय. उलटपक्षी कैरीच्या सालीमागचा स्पर्श मृदूमुलायम असतो. आपला वेग आपोआप मंदावतो. त्या स्पर्शाने बोटाचे भान सपशेल हरपलेले असते.... आपण अलगद त्यात ओढले जातो आणि एक फोड हलकेच चाखून पाहतो. त्याचा सूड अजून संपलेला नसतो.
मग आपल्याला तिडीक येते. साल्याचं दिसणं एक आणि असणं एक. आता या असल्या मिठ्ठास कै-यांचं लोणचं कसं घालायचं? केवढा हा विश्वासघात. एवढ्या मेहनतीने फोडी केल्या त्या काय आता खारू घालायच्याये का काय?
च्यामारी या खोबराआंब्याच्या तर.....!
.....
आपणही मग जिद्दीला पेटतो. त्या फोडींचे एकेक करून सालटे छिलून काढतो आणि कढईत घालून साखरेच्या पाकात त्याला रटरटवतो. एक शंका असतेच शेजारी, केलंय खरं काहीतरी; पण फोडी अंठरून जातील. आकसून वात्तड होतील. आपण चमकून बघतो.
......
असो, त्या रेसिपीचं तिकडं जे व्हायचं ते होईल; पण तुमच्या एक लक्षात आलंय काय, स्सालं किती दिवस कुठे दडून बसला होता हा अंठरून शब्द. या निमित्ताने नव्यानं आलाय पुन्हा समोर. वापरायला मिळालाय मस्त. आता दोन दिवस त्याचा यथेच्छ वापर करायचा. केवढा मोठा आनंदै, साखरेत घोळलेल्या खोब-याची आख्खी वाटी मिळाल्यासारखा!
......
माझं मत विचाराल तर मी त्या फोडी अंठरून जाण्याच्या बाजूचाये. रेसिपी हुकली तरी चालेल, किंबहुना ती हुकलीच पाहिजे. त्याशिवाय शब्द टिकतील कसे? उद्या आंब्याने इजळायचंच नाही असं ठरवलं तर गेला की, तोही शब्द असाच बाराच्या भावात. त्यामुळे आंब्याने इजळलंच पाहिजे, कैरीच्या फोडींनी अधूनमधून अंठरून गेलंच पाहिजे. शिवाय या प्रतिमा माणसांना वापरायलाही किती जबरायेत. आजूबाजूला दिसतातही कितीदा तरी इजळलेले आणि अंठरून गेलेले माणसं.
भाषा समृद्धीसाठी शब्द शिलकीत राहणं महत्त्वाचै आणि शब्द शिलकीत राहण्यासाठी चुकणं अत्यावश्यक आहे. आंब्याचं काय तो दर मोसमात येत राहील, रेसिपीचं काय, त्या वेळोवेळी होत राहतील. शब्दांची रेसिपी मात्र पुन्हा पुन्हा जुळून येत नसते!

टिप्पण्या