अविश्वसनीय वाटावं असं
एकेदिवशी पुण्यातून फोन आला. ऑपरेटर म्हणाला, कुणी सुनिता देशपांडे बोलताहेत. तुमच्याशी बोलायचं म्हणताहेत. मला काही केल्या आठवेना, पुण्यात या नावाचं नातेवाईकांत आणि परिचयात कुणीच नव्हतं.
घेतला फोन. पलिकडून आवाज आला. तुमचा ‘सोयरेसकळ’वरचा लेख वाचला. पत्र टाकणार होते; पण म्हटलं उशीर होईल, म्हणून फोनच केला.
माझी बोलतीच बंद. काय बोलावं सुधरेचना. हे सगळं अनपेक्षित होतं. त्या काही बोलत होत्या. मी मान डोलावत होतो. कळत काहीच नव्हतं. त्यांचा फोन अशक्य गोष्ट होती, त्यावर विश्वास ठेवायलाच वेळ जावू द्यावा लागणार होता. त्यांनी बोलणं बंद करावं आणि फोन ठेवावा असंही वाटू लागलं होतं. तरीही जराशी हिंमत करून म्हणालोच मी, भाई कसे आहेत? त्या म्हणाल्या, ठिक आहेत, हे काय इथेच झोपले आहेत.
कुठल्या वाक्याने संवादाचा शेवट झाला कळालंही नाही. संभाषण संपलं. पंलगावर भाई झोपले आहेत, शेजारी सुनिताबाई बसलेल्या आहेत आणि तेथून फोनवर आपल्याशी बोलताहेत, हे भलतंच अविश्वसनीय होतं. माझ्या शेजारच्या टेबलावर सहायक संपादक बसले होते. त्यांनी चेह-यावरचे हावभाव ओळखले. ते म्हणाले, बैस, काय झालंय?
........
तेव्हा सुनिताबाईंंचं ‘सोयरेसकळ’ आलं होतं. आवडून गेलं. त्यावर मग रविवार पुरवणीत एक परिचयात्मक लेख लिहिला. इतरांना पाठवतो तसं दैनिकाने त्यांनाही कात्रण पाठवून दिलं होतं. कधीच कुणाचं अशा गोष्टीत उत्तर येत नसतं, फोन तर कधीच नाही. म्हणून ते विसरल्यागत झालं होतं. आणि चक्क सुनिताबाईंनी फोन करावा?
पुढचे काही दिवस हवेत गेले. काही काळानंतर पुलं गेले. मित्र स्वागत थोरात यांनी पुलंचं काही साहित्य ब्रेलमध्ये आणलं होतं. त्याचं प्रकाशन करायचं होतं. फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते पुलंच्या भांडारकर रोडवरच्या फ्लॅटच्या खालीच त्याचं विमोचन व्हावं असं ठरलं. औरंगाबादहून फमुंना आणण्याची जबाबदारी त्याने माझ्याकडे दिली होती.
आम्ही गेलो. कार्यक्रमाला थोडा वेळ होता म्हणून वर पुलंच्या फ्लॅटमध्ये थोड्यावेळ थांबावं असं ठरलं. सुनिताबाई होत्या. त्यांचीही ओळख होईल, फोनवर बोलणं झाल्यामुळे त्या ओळखतही असतील असं उगाच वाटत होतं. मी आणि फमुंसर त्यांच्या बाहेरच्या खोलीत बसलो. पुलंचा स्पर्श असलेल्या त्या वास्तूत आपण प्रत्यक्ष आलो आहोत हे स्वप्नवत वाटायला लागलं. विश्वास बसेना. आतून दाटून आलं. एका सोफ्यावर आम्ही आणि समोरच्यावर सुनिताबाई. फमुंसर आणि त्या दोघं बोलले. मी आधीच दबून गेलेलो. सरांनी माझी ओळख करून दिली. मी त्यांना पूर्वी फोनवर झालेल्या बोलण्याची आठवण करून दिली. त्यांना काही केल्या ते आठवलं नाही. ते शक्यही नव्हतं.
..
आम्ही निघताना एक बाई आल्या. निवृत्त शिक्षिका असाव्यात. पुलं कसे आमच्या शाळेत एकदा आले होते... वगैरे वगैरे त्यांनी सुरू केलं. सुनिताबाई त्यांना भरपूर रोखत होत्या; पण त्या थांबायलाच तयार नव्हत्या. नंतर सुनिताबाई शांतपणे सोफ्यावर बसून राहिल्या. पुलंच्या लेखातलंच एखादं कॅरेक्टर बघत असल्याचा भास होत राहिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा