बुभुक्षित तज्ज्ञ आणि झाडांचे अवयव

सोशल मिडियातून नव्याने उमललेला एक स्वयंघोषित तज्ज्ञ माझ्याकडची कोरफड बघून म्हणाला,
'केवढी मस्त आलीये. तिला फूलही आलेय. परिपक्व झालीये म्हणायची. तिचा फार उपेगै बरं. कोरफडीचा ज्यूस करून प्यावा. त्याचा मगस केसांना लावावा. त्याचा गर अंगावर रगडला तर काळे डाग जातात.'
पुढे गोकर्णीचा पिसारा बघून म्हणाला,
'तुम्ही निळा चहा पिलाय काहो कधी? गोकर्णीच्या फुलांचा चहा मस्त असतो. आरोग्यवर्धक असतो. त्याच्या शेंगा, पानं इव्हन मुळंही औषधी असतात.'
तसंच कडीपत्त्याचं, लिंबाच्या पानाचं महत्त्व सांगून तो तुळशीकडे वळला. मी त्याला थांबवलं. तुळस मंजिऱ्यात आली होती. ती देवांसाठी असते. तिचं पावित्र्य राखलं पाहिजे.
.....
नंतर नंतर झाडांकडे बघण्याची त्याची नजर मला बुभूक्षितच वाटू लागली. हा माणूस बोलता बोलता झाडाला हात घालतो का काय, ओरबाडतो का काय असं वाटू लागलं. झाडांची इज्जत धोक्यात आली होती. मला प्रचंड काळजी वाटू लागली. त्यांना वस्त्र चढवून झाकून ठेवावे का काय असेही एकदा वाटून गेले.
आपण हौसेने झाडं लावतो. त्याचे माफक फायदे आपल्यालाही माहीत असतात. पण म्हणून प्रत्येक वेळेस त्यांच्या अवयवांवर लक्ष ठेवणं बरं नव्हे!
ही माणसं निसर्गाचा निखळ आस्वाद का घेत नाहीत? झाडांना झाडासाखी का वागणूक देत नाहीत?
यू ट्यूबवर बघून झाडांझुडपांवर कायम अशी बुरी नजर?
हे तर असं झालं की, एखाद्यानं तुमच्या घरी यावं. तुमच्या कुत्र्या मांजराचं कौतुक करावं आणि नंतर हलक्या आवाजात विचारावं, तुम्ही कधी कुत्र्याचं मटण खाल्लंय काहो? मस्त लागतं. तुलनेनं मांजराचं तेवढं रुचत नाही आपल्याला!
बापरे!

टिप्पण्या