१४ ऑगस्ट दुपार

१४ ऑगस्ट. गावाकडची गोष्ट. दुपारची वेळ. काही मित्र एका डॉक्टर मित्राकडे बसलो होतो.
एक बारा तेरा वर्षाचा पोरगा धावत आला. त्याच्यामागे आणखी दोनचार जण आले. त्याला पान लागलं होतं.
पंधरा ऑगस्टसाठी त्यानं कपडे धुवायला काढले होते. सपराचं घर होतं. त्यानं वर लटकावलेली बादली काढली तर त्यात बसलेल्या सापानं त्याला दंश केला. आई बाहेरगावी मजुरीला गेलेली. वडिलही दुसऱ्या गावी सालदार.
डॉक्टरांनी लगेच सरकारी दवाखान्यात पाठवलं. काही उपचार झाले. कुणी वीष उतरवणारा बाबा धरून आणला.
हळूहळू आख्खं गाव मारूतीच्या देवळाजवळ जमा झालं. कुणी कोंबड्या आणल्या. ओवाळल्या. पोरगा वाचला नाही. पण संपूर्ण गाव देवळाबाहेर चमत्काराच्या आशेनं उपाशीपोटी रात्रभर बसून राहिलं.
.......
कित्येक वर्ष उलटून गेली; पण १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला मला, धापा टाकत आलेला तो कोवळा पोरगा आणि त्याच्यासाठी बसून राहिलेला गाव हमखास डोळ्यापुढे येतो.

टिप्पण्या