झाडाला दाखवावा फोटो

कधी कधी वाटतं, झाडाला त्याचा लहानपणीचा फोटो दाखवला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की, बघ. आणलं तेव्हा कितकुसाक होतास तू. नुसतं पाप्याचं पित्तर. आता कसा धट्टाकट्टा झालायेस. तुझ्या बुंध्याचा घेर किती वाढलाय. तुझे हात आभाळभर पसरलेत. वरपर्यंत नजर ठरेना गेलीय.
तुला आणलं तेव्हा तुझ्यासाठी खास ट्रीगार्ड बनवलं होतं. साग्रसंगीत तुझी प्रतिष्ठापना केली. मात्र काही महिने तू फुरंगटूनच बसलास. तुझी वाढच नाही. नंतर लक्षात आलं, दुपारी बकऱ्या डल्ला मारताहेत तुझ्यावर. जरासा वाढलास की, ट्रीगार्डवर पाय ठेवून तुझ्या कोवळ्या पानांचं यथेच्छ चर्वण चालायचं.
दरम्यान आली चिंकी. होती एवढुशीकच; पण तिचं भुंकणं दणकेबाज. तिला बांधलं ट्रीगार्डला. मग काय बिशाद त्या बकऱ्यांची. दहा अकरा वर्षे राहून चिंकी गेली. तू मात्र आभाळाकडे झेप घेतलीस. काय दिमाखै तुझा. मोसमात तुझ्या शूभ्र फुलांचा सडा पडतो घरासमोर. तुझ्या गंधाने आणि सौंदर्याने सारा परिसर भारावून टाकलायेस तू.

आणखी उंच आणखी उंच जा
कदाचित तिथेच कुठेतरी तुला
प्राणप्रिय चिंकीचा भास होईल
खुशाली विचार, आभार मान!
मित्रा लक्षात ठेव, तुझ्या उंचीसाठी
दुसऱ्या कुणाचं तरी योगदान आहे!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा