बांबूची वाटमारी

पाऊस दणकावून चालूये. आळ्यात, कुंड्यात पाणी साचूनै. निचरा करावा म्हणून पामची कुंडी बाजुला केली तर भिंतीला खेटून ताठ्यात वर आलेली गोल्डन बांबूची ही जुळी पिल्लं दिसली.
काही वर्षांपूर्वी शेजारच्या वॉचमनने मला हे गोल्डन बांबूचं रोप आणून दिलं होतं. कुठल्या तरी बिल्डरकडे तो काम करायचा. त्याच्याकडे काढून फेकलेल्यापैकी हे होतं. ते टिकेल की नाही शंका होती. पण टिकलं.
दरवर्षी त्याला जुळी पिल्लं येतात. पैकी एक जगतं. यंदा हे उशीरा प्रगट झालेत. जुलैमध्येच ही मंडळी येतात आणि ऑगस्ट शेवटापर्यंत सणसणीत उंची गाठतात. एवढी की, वीजेच्या तारा ओलांडून वर झेप घेतात. बिल्डरकडचे असल्याचा हा ताठाच असतो जणू.
पण यंदा मी त्यांना आर्ध्यातच थांबवण्याच्या विचारात आहे. मागच्या वर्षीच्या बांबूने वीजेच्या तारांशी एवढा खेळ केलाय आणि धुडगूस घातलाय की त्याला आवरताना नाकेनऊ आले होते.
शिवाय पेपरची वाटमारी वेगळीच. महिनाभरातून एखादा पेपर हे लांबवतातच. त्यांच्या दाटीत ते दिसतही नाहीत. थेट उन्हाळ्यातच ते पाहायला मिळतात. कोण्या वाचकाचं भूत बसलंय की त्यावर?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा