बुरशीसम्राट

बागेचा कोपरा. आलेला एक वेल गेला. पेरलेल्या बिया उगवल्या नाहीत. जिथे गांडुळांची भरमार होती तिथे जेमतेम दोनचारच. मग माती खालीवर करायला सुरू केलं तर खाली बुरशीसम्राटाचं साम्राज्य दूरवर पसरलेलं. ते उघड्यावर आलं आणि विखरलं.
पण त्यांना मानलं पाहिजे. काय बारीक कामै. झाडांच्या मुळ्या, नारळाच्या शेंड्या, काडीकचरा पांढऱ्याशुभ्र धाग्यांनी नाजूक विणलेला. मातीखाली असून साधा एक डाग नाही. डिटर्जंटवाल्यांना कॉम्प्लेक्स यावा एवढी सफेदी.
तेवढ्यात दस्तुरखुद्द बुरशीसम्राटच बाहेर आले. त्यांचं दर्शन म्हणजे गोष्टीतल्या राजकन्येच्या स्वप्नात येणारा पांढऱ्या पायघोळ वस्त्रातला तरणाबांड तरूणच आठवावा. महाशय साम्राज्य सोडून परागंदा होण्याच्या विचारात असावेत. त्यांनी उघड्यावर येण्याचा अवकाश की लाल मुंग्यांनी त्यांना घेरलं. काही क्षणात ते धारातीर्थी पडले.
जरा दुसरीकडे उकरावं म्हटलं तर पैश्याचे बालगोपाल रमतगमत चालले होते. जरा थांबून तिथली वीट उचलली तर खाली सापसुरळीचे चिरंजीव. नंतर मग काळ्याकुळकुळीत: पण चमकदार किड्यांची लगबग दिसली.
मातीखालची दुनिया न्यारीच आहे.
हे बुरशीसम्राट जणू पिठ्या ढेकणाच्या जातकुळीतलेच असावेत असा शुभ्र रंग.
....
कोणी, कितीही शुभ्र कपड्यात असो; पण तो मातीला घातक असेल तर बुरशीनाशकाला पर्याय नाही. त्याचा नायनाट झालाच पाहिजे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा