पाखरांचा राबता

रस्त्यांवरनं जाणा-या वाहनांचे कर्णकर्कश्य हॉर्न असोत किंवा मंगलकार्यालयातल्या डिजेचा धांगडधिंगा असो, तसल्या गदारोळातही आमच्याकडच्या पक्ष्यांनी आपले आवाज शाबूत ठेवले आहेत. नको असलेले आवाज डिलीट करून त्यांचेच मंजुळ स्वर ऐकण्याचे तंत्र आम्हाला हळूहळू जमू लागले आहे.

घरासमोरच्या झाडांवर श्री. आणि सौ. कोकिळ कुटुंबीय रहातात. रामफळाच्या आणि अंजिरांच्या दिवसात ते आवर्जून जोडीने येतात. मनसोक्त पोटपूजा करून जातात. एरवी त्यांचा नुसता आवाज येतो; पण या काळात त्यांचं दर्शन आम्हाला होतं. खारुतार्इंचीही लगबग आमच्याकडे टिकून आहे. फळांच्या काळात तर त्या असा ताव मारतात की, टम्म फुगून आडव्या मांजरीच भासू लागतात. भारद्वाजही येवून कंपाऊंटवॉलच्या भिंतीवर मॉर्निगवॉक घेवून आल्यापावली निघून जातात.

फार पूर्वी वाड्यातल्या आंब्यावर एका पक्ष्याचं घरटं होतं. ते महाशय स्थापत्त्यशास्त्रातले असावेत. कारण त्यांच्या घरट्यात चक्क प्लास्टीक वापरण्यात आलं होतं. दुस-या एका पक्षाने अंजिराचं एक भलं मोठं पान मुडपून त्यात अंडी दिली होती. पानांवर बाहेरून शिवण होती. त्यावरनं कोणीतरी म्हणालं की, ते शिंपी पक्ष्याचं घरटं असावं.

वीजमीटरवर पूर्वी एमएसइबीने एक लाकडी खोकं ठोकलं होतं. तिथल्या खोप्यात विणीच्या हंगामात दरवर्षी पिलं दिसायची. पक्ष्यांनी अंडी कधी घातली ते कळायचंच नाही. काही दिवसांनी त्यांच्या चकरा सुरू झाल्या की लक्षात यायचं. जोडप्यातला एकजण विजेच्या तारांवर तर एकजण पिलांच्या खोप्याजवळ असायचा. काही सेकंदात ते उडून जायचे.

त्यांचा स्वभाव थोडा खट्याळ होता. कारण जातायेता ते तिथंच बांधलेल्या चिंकीला चोचा मारायचे. चिंकी उचकायची आणि आभाळाकडे तोंड करून भुंकायची. तो पर्यंत ही जोडी पसार झालेली असायची. मग तिला दुसरीकडे बांधावे लागायचे. नवे मीटर बसवल्यानंतर त्या पक्ष्यांना ती जागा राहिली नाही. पुढे काही दिवसांनी एका पक्ष्याने मधुमालतीच्या जाळीत अंडी घातली होती. पण नंतर पुन्हा कधी ते पक्षी दिसलेच नाहीत. अंड्याचं कवच मात्र नंतर गुलबक्षीत सापडलं.

अलीकडे मांजरांचा उच्छाद वाढला आहे. त्यांचा डोळा पक्ष्यांसह खारींवरही असतो. त्यामुळे मांजरांची चाहुल लागली की, पक्ष्यांचा किलकिलाट सुरू होतो. ते अक्षरश: चिरकू लागतात. खारींच्याही बारक्या आवाजात खाणाखुणा सुरू होतात. यंदा माझ्याकडच्या झाडावर पक्ष्याचे घरटे दिसत नाही. दिवसभर ज्यांची ये जा चालू असते ते बहुतेक पाहुणे म्हणून येतात आणि मुक्कामाला दुसरीकडे निघून जातात.

सांगण्याचं निमित्त असं की, परवा सहजच आमचा कवीमित्र दासू वैद्य याने त्याच्याकडचं पक्ष्याचं एक सुंदर घरटं मला दिलं. घरटं कसलं रंगकाम केलेला चिरेबंदी वाडाच आहे तो. ते आणून लावलंय. पक्षी येतील तेव्हा येतील. तूर्तास दासूच्याच कवितेतील काही पक्षी मी या घरट्यांत मुक्कामाला घेऊन आलोय.

टिप्पण्या