गोगलगाय, पोटात पाय!
यंदाच्या पावसाळ्यात बागेत गोगलगायीचं प्रमाण फारच वाढलं. बघावं तिथं गोगलगायी. अगदीच पहिल्यांदा तिला बागेत पाहिलं, तेव्हा फार आनंद झाला होता. बालपणाचीच आठवण दाटून आली होती. मग दोन पायावर बसून तिच्या मागे फिरलो होतो. ती गेल्याच्या दिशेने चिकटशी छोटी पाऊलवाट चमकायची. कधी भिंतीवरही तिच्या नुकत्याच गेल्याच्या खुणाही दिसायच्या. मजा वाटायची.
नंतर कळालं की, बागेची नासधूस करण्यात गोगलगायीचा हात असतो. ते कळाल्यावर तिच्याविषयीची इमेजच ढासळून गेली मनातून. नंतरच्या वर्षी तर त्यांची संख्या वाढत गेली.
गोगलगायमुक्त बाग करण्यासाठी मग उपाय शोधायला सुरुवात केली. त्यांचा नायनाट कसा करायचा यावर अनेकांनी निरनिराळे उपाय सांगितले. पण प्रत्येक उपायात तिचे अंडे नष्ट करणे, तिला ठार मारणे असंच होतं. त्यासाठी मन काही धजवेना. गोगलगाय हा शब्दच किती जिव्हाळ्याचा वाटतो. कदाचित दुसरं काही नाव असतं तर नायनाट केलाही असता; पण गोगलगाय शब्द नाही मारू शकत आपण.
दुसरा एकजण म्हणाला, तुझ्या हातानं नाही मारू शकत ना, मग असं कर, तू कोंबड्या पाळ. कोंबड्यांना आहारात गोगलगाय फार आवडते. त्यांना संपवण्याचं काम कोंबड्या करतील. नंतर एकही गोगलगाय दिसणार नाही तुझ्या बागेत.
मला त्याचाही सल्ला आवडला नाही. गोगलगायींना कोंबड्याच्या तोंडी देणं हे भलतंच पापाचं वाटू लागलं. शिवाय, गोगलगायींना टिपायला कोंबडी जिवंत तर राहिली पाहिजे. त्याआधीच येणा-या जाणा-याची नजर कोंबडीवर गेली तर? असा गमतीचा विचारही मनात आला.
पण मग वाटलं, अरे, एकूणच कोंबड्यांच्या तुलनेत आपल्याला गोगलगायीविषयी अधिक ममत्व वाटतंय की काय? आणि ते कशामुळे? तिच्या नावात गाय आहे म्हणून? आणि गाय आपल्याकडे पवित्र मानली जाते म्हणून? की आणखी दुसरं काही कारणै?
.....
परवा छोट्या कंपनीसोबत प्राण्यांतल्या शिकारींच्या काही क्लिप पहात होतो. वाघांच्या एका टोळीने हत्तीवर हल्ला केल्याचा व्हिडीओ होता. बराच वेळ त्यांच्यात ही झटापट चालली होती. प्रत्येकवेळी वाटायचं, आता हत्तीने उचलावा पाय आणि द्यावा वाघावर. त्याचा चेंदामेंदाच. जागेवरूनच मी हत्तीला चिअरिंगही करू लागलो.
पुढच्या एका क्लिपमध्ये चित्त्याने रान म्हशींवर हल्ला केल्याचे दृष्य होते. भला मोठा पाठलाग करत तो तिला पकडतो आणि तिचा फडशा पाडत असतानाच तिकडून दुसरी रानम्हैस येते आणि वाघाला शिंगावर उचलून फेकते. ते पाहतांना प्रचंड आनंद झाला. वाटलं अजून फेकावं, अजून फेकावं.
त्याही नंतर एक वाघ तळ्याकाठावर पाणी पीत होता. तेवढ्यात एक मगर तिथे आली आणि ती वाघाचा पाय पकडणार तोच वाघानं थेट पाण्यात उडी घेतली आणि दोघांत झटापट सुरू झाली. वाटलं, वाघानं आता हिचा फडशाच पाडला पाहिजे. ब-याच वेळानंतर वाघानं तिची मान तोंडात पकडून तिला बाहेर खेचत आणलं. प्रचंड आनंद झाला. पुढे जे घडायचं ते घडत गेलं.
प्रश्न असा की, वरच्या दोन प्रसंगात आपण वाघाच्या विरोधात होतो आणि शेवटच्या प्रसंगात मात्र त्याच्या बाजूने? असं का? हत्ती, रानम्हशींना आपला सॉफ्टकॉर्नर आहे आणि मगरीला मात्र नाही. असं का?
.....
गोगलगायी आपल्या बागेचं नुकसान करत असतानाही कोंबड्याच्या तुलनेत त्यांनाच आपली सहानुभूती का?
शालेय पाठ्यपुस्तकातून की अजून कुठून तरी त्या त्या वयात आपल्या डोक्यात कुणाकुणाविषयी काय काय इमेज तयार झालेली असते, देव जाणे. यालाच पूर्वग्रह म्हणायचं काय? मग माणसांविषयीही असंच होत असेल काय?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा