सडा आणि फुले!
सिझनमध्ये वेलींना एवढी फुले येतात की, त्यांचा सतत सडा पडत राहतो. सणावाराला भाविक मंडळी नेतात भरपूर; पण नंतर नुसतेच कौतुक उरते. एकदिवस नाही आवरलं की, त्या फुलांचा अक्षरश: चिखल साचत जातो.
मला असं वाटायचं की, देवमंडळी फुलांची एवढी शौकिन आहे तर मग, ते वेलींना टप्प्या टप्प्याने का बहार आणत नाही. वर्षातून एकदाच आणि एवढ्या प्रचंड प्रमाणावर फुलं आल्याने त्यांचं नियोजन अवघड होऊन जातं.
पुन्हा वाटलं की, छे, यात देवाचा काडीमात्र संबंध नसणार. सिझनचा काळ म्हणजे झाडावेलींचा उत्सवाचा काळ असणार, ऋण व्यक्त करण्याचा काळ असणार. आपल्या पालनपोषणासाठी धरतीचे आभार व्यक्त करण्यासाठीच ते असा सडा टाकत असणार. मायमातीला झाडांनी वाहिलेली ही फुले म्हणजेच सडा.
या चक्रात आपण म्हणजे केवळ निर्माल्याचे मानकरी. तेही काही क्षणांचेच. तेच निर्माल्य उचलून आपण झाडावेलींच्या पायाशी वाहावे. बस्स, झाली प्रदक्षिणा!
.......
दुसरी भावना अगदीच टोकाची, बहार गेल्यानंतरची. फुलांचा प्रचंड वर्षाव करून वेली नंतर थकून जातात. त्यांची पानं, छोट्या फांद्या वाळायला लागतात. फुलं उमलून, पडून गेल्याचे नुसते व्रण त्यांच्या फांद्यांवर लटकत असतात. त्या कळ्यांची ओस पडलेली घरेही सुकायला लागतात. अर्थातच मग आपण छाटणी करतो. तो नव्या जोमाने, नव्या पालवीसगट उमलून येण्यासाठी.
इथपर्यंत ठीक असतं.
मग छाटणी केलेला सारा राडा आपण कोप-यात रचून ठेवतो. सकाळी आपलं लक्ष तिकडे जातं आणि विचित्र वाटायला लागतं. पहिली गोष्ट म्हणजे, इतके दिवस वेलांनी व्यापलेली जागा भोंडी दिसायला लागते, मांडव भयाण वाटायला लागतो. त्याने जरा सुन्न व्हायला होतं. हा दरवर्षीचाच कार्यक्रम असल्याने ते आपण गृहित धरलेलं असतं. पण तरीही आतून हलवणारं फिलिंग तेव्हा येतं, जेव्हा आपण त्या मलूल पडलेल्या फांद्यांकडे पाहतो. त्या फांद्या आता काटक्या होण्याच्या तयारीत असतात. बहराच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या पाच दहा चुकार कळ्या त्यावर तशाच राहून गेलेल्या असतात. छाटणी करताना त्या दिसलेल्या नसतात. या काटक्यांवर त्या उमलून आलेल्या असतात, अगदी टवटवीत. मलूल फांद्या आणि त्यावरची ही तजेलदार फुलं पाहिलं की, कासाविस होतं. वेलीच्या कलेवरावर वाहिलेल्या फुलांगत ते दिसायला लागतं. आपल्याला मग विनाकारणच धडधडायला होतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा