उर्वरित रंगकाम आणि सुटलेली पोटं!
माणसाला एकवेळ रंगसंगती कळत नसेल तर चालतं; पण रंगाचं प्रमाण मात्र कळालं पाहिजे.
बैठकीतल्या दिवाणचे दोन पाय रंग उडून कोड फुटल्यागत दिसू लागले म्हणून मध्यंतरी ऑईलपेंट आणला. ते दोन्ही पाय रंगवून काढले. नंतर मग मागचेही दोन पाय रंगवले. डब्यात बराच रंग शिल्लक राहिला म्हणून आडव्या बाजूच्या- उभ्या बाजूच्या दोन्ही पट्ट्या रंगवून काढल्या. तरीही डबा टस की मस हलला नाही.
डब्यात रंग तसाच ठेवला तर त्याला साय येते, ब्रशही आखडून खुडून जातो असल्या कौटुंबिक सूचना सुटत गेल्या. मग आपसूकच रंग मारण्यासारखं घरात अजून काय काय आहे याचा आंदाजा घेतला.
तर मग एक स्टुल रंगवून झाला. नंतर एक टीपॉय झाला. जुन्या काळातलंं एक लोखंडी कपाट होतं. ते झालं. पुस्तकाचं एक रॅक होतंं, ते झालं. तरीही रंग शिल्लकच. कमी पडला तर अजून आणता येईल म्हणून मग आख्खा डायनिंग टेबलच रंगवायला घेतला. नंतर त्याच्या खुर्च्या घेतल्या. माळ््यावरनं एक जुना पुराणा चौरंग काढला. त्याच्याखाली दोनेक पाट होते, तेही काढले. रंग संपत आला असं वाटायचं, पण तो मारुतीच्या शेपटीसारखा चालतच राहायचा. शेवटी ग्रीलच्या छुप्या जागा आणि धान्याच्या कोठीचा सपाट प्रदेश याच्या दरम्यान तो कधीतरी संपून गेला. तेव्हा कुठे ब्रशने टर्पेंटाईलचे घटाघटा घोट घेतले आणि अंगाखांद्यावरचा रंग मोकळा केला.
....
खरं तर, नुसत्या रंगाचंच नाही, दुसरं कुठलंही प्रमाण हुकलं की, माणसाची गोची होत असतेच; पण त्याहीपेक्षा भयानक गोष्ट असते, ती अमूक एक गोष्ट संपवण्याची. त्याच्या आग्रहाची.
आपल्याकडं माणसांच्या ढे-या एवढ्या का सुटलेल्या असतात याचं कधी नेमकं कारण शोधलंय का आपण? फक्त आणि फक्त अमूक एक गोष्ट संपवण्याच्या कौटुंबिक अट्टहासापायीच आपल्यातले बरेच जण असे ढेरपोटे होऊन बसले आहेत. ‘आज बघा, मोजकाच...नेमकाच स्वैपाक झाला’ एवढ्या एका वाक्यासाठी माणसांच्या पिढ्यांच्या पिढ्या आतापर्यंत पोटं नांदवत फिरल्या आहेत. कधी पातेल्याच्या तळाशी चिकटलेल्या भाजीत त्यांनी भाकरी कुस्करून नुसतेच तुकडे खाल्लेत. कधी कढईभर वरणात उरलेल्या भाताचं इवलुसंक ढेकूळ बुडवून, त्याच्या नाकातोंडात वरण शिरून त्याचा लोळागोळा होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली आहे. नंतरच ते खाल्लं पिल्लं आणि ओरपलं आहे. ह्या माणसांनी कधीच भात-वरण, भाजी-भाकरी यांचं व्यस्त प्रमाण मनावर घेतलेलं नाही. कधी तक्रारही केलेली नाही. ‘नेमकाच’ या खटल्याच्या एका समाधानासाठी कित्येकांनी आपला देह असा कायम झुलत ठेवला आहे. खरं तर ही गोष्ट कौटुंबिक अत्याचाराचाच एक भाग मानायला पाहिजे होती; पण ती समजून-उमजून असल्यानं कधी चव्हाट्यावर आलेली नाही.
...
रंग कुठं आणि ढे-या कुठं? काही तरी संबंध हाये काय?
असं जर कुणी म्हणत असेल तर ती शुद्ध पळवाट आहे!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा