दौडा दौडा दौडा घोडा, दारू उठा के दौडा!

भाच्चा म्हणाला,
मामा, दारू सोडायचीये का?
मी दचकून बघितलं. त्याच्या प्रश्नात खोट नव्हती; पण टोनमध्ये मात्र होती. पठ्ठ्या विचारतोय, सोडायचीये का म्हणून आणि त्याचा टोन मात्र असा की, जणू ऑफर देतोय, थोडी थोडी घ्यायचीये का? म्हणून.
मी म्हटलं, ‘नाय ब्वॉ. एक तर मी घेत नाही, त्यात अवेळी तर बिलकुलच घेत नाही. शिवाय ती सोडण्यासाठी कष्ट घ्यावेत एवढे व्यसनही मला नाही.’
तो म्हणाला, ‘नाही. जनरल बोलतोय. तुझ्या ओळखीत असेल ना कुणीतरी, ज्याची दारु सोडायची वगैरे असेल. माझ्याकडं त्यासाठी जबरा उपाय आहे.’
मी ऐकायला सज्ज झालो. सांगतोय तर ऐकून घ्यायला काय हरकतै? असे उपाय कधी, कुणासाठी, केव्हा उपयोगात येतील सांगता येत नसतं. भले आपल्याला व्यसन असो वा नसो, माहिती तर पाहिजेच. शिवाय व्यसन असतानाच व्यसन सुटण्याचा उपाय करावा असं तरी कुणी सांगितलंय?
तर तो म्हणाला, ‘मामा, अगदी साधा उपाये. आधी एक घोडेवाला गाठायचा. त्याचं घोडं किरायानं घ्यायचं. त्यावर आपल्या लेकराबाळांना सैर करायला लावायची. घोडेवाल्याला म्हणायचं, पळपळ पळव घोड्याला. त्याला इतका पळव की, घोड्याला घाम आला पाहिजे. तो निथळला पाहिजे. मग तो घाम बाटलीत भरून ठेवायचा. ज्याला खूप व्यसनै, ज्याची दारू सुटत नाही, त्याच्या पेगमध्ये हळूचकन या घामातले काही थेंब मिसळायचे. बस्स! एका झटक्यात सुटते की नाही बघ दारू.’
‘याचा प्रयोग कोणावर करून बघितलाहेस तू?’
‘ अजून नाही. त्या घोड्यावाल्याने परवाच सांगितलंय मला. त्याने खूप जणांना दिलाय घाम. त्यातून ब-याच जणांची सुटलीये म्हणाला दारू.’
‘अरे वा, पण मला एक सांग, तो घाम आपण थेट विकतच घ्यायचा ना. उगाच त्यासाठी एक घोडा घ्या, त्यावर लेकराबाळांना बसवा, त्याला पळवा...वगैरे वगैरे लांबलचक रेसिपी कशासाठी? की हेही घोडेवाल्यानेच सांगितलंय?’
‘त्यात सांगण्यासारखं काय आहे मामा? साधी गोष्टै. हा उपाय करायचाच असेल तर त्यासाठी आपल्याला एक घोडा लागणारच. त्याचा घाम काढायचा म्हणजे त्याला पळवावं लागणारच. त्या पळवण्याचे पैसे पडणारच. एवढे पैसे आपण मोजणारच आहोत तर मग पोराबाळांना चक्कर का नको? आणि घोड्याने तरी एकट्याने निरुद्देश का पळावं? आणि खरं म्हणजे आपण प्रत्यक्ष हजर असल्याने ताजाताजा घाम मिळतो ना, आपल्यासमोर काढलेला. जेवढा घाम ताजा, तेवढी खात्री जास्त. म्हणून...’
च्यायला, हे बरंय, दारू सोडायचीये आपल्याला आणि पळायचं मात्र घोड्याने. कुणाच्या घामावर कुणाची व्यसनं!
.......
सध्या मला एका गोष्टीचं फार वैषम्य वाटतंय. दारू सोडण्याचा एवढा चांगला उपाय मला कळालेला असताना माझ्या ओळखीत एकही दारुडा नसावा याला काय म्हणावे? तुमच्या ज्ञानाचा उपयोग जर कुणासाठी होत नसेल तर तुमचं ज्ञान आणि तुमचं जगणं सपशेल व्यर्थ असतं. ज्ञानार्जनासाठी आता आपणच तशी माणसं तयार करावीत की काय?
अजून एका गोष्टीचं मला वैषम्य वाटतं. सगळ्या प्रकारच्या बाटल्यांवर जर सर्वाधिक चित्र कुणाची असतील तर ती घोड्याचीच आहेत. बहुतांशी ब्रँड घोड्याच्या नावावरच. म्हणजे दारू कंपन्यांचा सगळ्यात फेव्हरेट प्राणी शंभर टक्के घोडाच. रेड हॉर्स, ब्लॅक हॉर्स, व्हाईट हॉर्स, क्रेझी हॉर्स, डार्क हॉर्स आणि आणखी असेच कितीतरी उमदे घोडे बाटल्याबाटल्यांवर पळताहेत. काय रुबाबदार दिसतोहे त्यातला एकेक घोडा. दारूचं प्रेरणास्थान असणा-या या घोड्याचाच घाम आपण दारूत मिसळून एखाद्या मद्यरसिकाला दारूपासून मुक्त करायचं? वंचित ठेवायचं? हा कोणता न्याय झाला?
......
आतली गोष्ट अशी की, बाटलीवरच्या घोड्यांवर जो काही घाम साचतो ना त्याचं देखणेपण एै-यागै-याला नाही कळणार. काय पारदर्शक थेंब असतात ते. थंडगार. ते बघूनच घसा असा फुरफुरतो की बस्स!
(वैधानिक इशारा: घोडेवाल्याच्या सल्ल्याशिवाय घामाचा उपाय घरच्या घरी अमलात आणू नये. घोडा जर खात्रीचा नसेल तर पिणारा आणि पाजणारा यांच्यापैकी कुणातरी एकाचा गाढव होण्याची दाट शक्यता असते.)
चित्र: नेटवरनं हाणलंय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा