चिंकी आणि टमाट्याची रोपे



आमच्या कॉलनीत हातगाड्यांवर भाजी विकणा-यांची संख्या खूप होती. निरनिराळ््या वेळात ते यायचे. भाजी घेण्यासाठी बायकांची गर्दी होत. या भाजीवाल्यांचं आणि चिंकीचं हेट अँड लव्ह रिलेशनशीप होतं. पूर्वी ती भाजीवाल्यांवर जीव तोडून भुंकायची. आख्खा परिसर दणाणून सोडायची. नंतर तिचा एक फेवरेट भाजीवाला झाला. त्याचं नाव पाराजी. त्याची हाक ऐकू आली की, चिंकीच्या भुंकण्यात लटकेपणा यायचा. तिचं शेपूट गोंडा घोळायला लागायचं.
सुरवातीच्या काळात चिंकीच्या भुंकण्यानं वैतागलेल्या पाराजीनं तिला सहज म्हणून टमाटं टाकलं होतं. तिला ते आवडून गेलं. नंतर तो रोजच टाकू लागला. चिंकी टमाट्याची शौकीनच झाली. भाजीवाल्याची वेळ झाली की तिची तगमग वाढायची. दूरवरही त्याचा आवाज आला की, तिचं ते लाडीक भुंकणं सुरू व्हायचं. नंतर तर ती जकातच होऊन गेली. टमाट्याचे भाव काहीही असो, तिला टमाटा मिळायचाच. भाजीवाला म्हणायचा, तिच्यामुळं धंदा वाढलाय माझा. एक-दोन टमाट्याने काय व्हायलंय?
पुढे झालं असं की, बाकीच्या काही भाजीवाल्यांनीही त्याचं अनुकरण सुरू केलं. उरलेल्या एकदोन टमाट्यात रोज भर पडत चालली आणि त्याचाही चिखल होऊ लागला. तो राडा उचलून टाकण्याचा एक कार्यक्रम मग चारपाच दिवसांआड हाती घ्यावा लागायचा. त्यातले निबर टमाटे चिंकीसाठी ठेवून उरलेले आळ््यात टाकले जायचे.
पुढे मग गाजरं, वटाण्याच्या शेंगा, टरबूज-खरबूज असे कायकाय नाद चिंकीला लागले. तिचे ते लाड मर्यादित वेळेला पुरवलेही जायचे.
.......
चिंकी गेली त्यानंतरच्या एके वर्षी मात्र जोरदार पाऊस आला. दोनतीन पावसानंतर जमिनीखालून बरंच काय काय उगवून वर येऊ लागलं. गेट जवळच्या आळ््यात बघितलं तर टमाट्याची रोपेच रोपे. त्यातली काही रोपे दुसरीकडे लावली. काही रुजली, काही नाही. जी आली त्यांनी त्या वर्षी भरपूर टमाटे दिले.
आता आजूबाजूला भाज्यांची दुकाने झालीयेत. हातगाड्यांवर भाजी विकणा-यांची संख्या रोडावलीये. आता पाराजी फारसा येत नाही. चिंकीचं ते लाडिक भुंकणं त्याच्या स्मरणात असेल काय?
....

चिंकी आणि पेपरवाला भागवत
हा आमचा पेपरवाला मित्र, भागवत. गेली किमान पंचवीस वर्षे तो माझ्याकडे पेपर टाकतोय. राजकारणापासून घरगुती समस्यांपर्यंत चर्चा कराव्यात एवढं त्याचं आणि आमचं नातं जिव्हाळ्याचं आहे.
तर या भागवतचं आणि चिंकीचं कधीच जमलं नाही. अगदी एकदिवसही त्याच्यावर भुंकण्यात तिने कुचराई केली नाही. खरं तर एकदा भेट झालेल्या व्यक्तीवर चिंकी दुस-यांदा कधी भुंकायची नाही. पण पेपरवाला भागवत याला अपवाद होता. त्याच्यावर भुंकण्याची तिची वेगळी लय होती. पेपर आल्याचं त्यातून कळून जायचं.
चिंकीचं आणि त्याचं जमावं म्हणून आम्ही अनेक उपाय करून पाहिले. त्याच्या हातून तिला दूध बिस्कीट दिलं, पेडिग्री दिली. तेवढं खाईपर्यंत ती गप्प बसायची आणि नंतर पुन्हा भुंकायला सुरवात. बरं त्याच्या गाडीची फायरिंगही तिला पाठ होती. येताना आणि जाताना त्या आवाजाच्या दिशेने ती पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ भुंकायची. खूप दिवसानंतर आम्ही असा अंदाज केला की, तिचा राग पेपरवाल्यापेक्षा पेपरवर असावा. आणि तो पेपर टाकतो म्हणून त्याच्यावर निघत असावा.
उकाडा असला की, कुत्र्यांना आळ्यातली माती उकरून त्यात बैठक मारण्याची सवय असते. चिंकीलाही ती होती. तिच्या उकराउकरीत नव्यानं आणून लावलेली काही रोपं बळी गेली. तिच्या नखांनी मूळांना इजा पोहोचायची आणि रोपं मान टाकायची. मग चीड येऊन मी तिला हलक्या हाताने एकदोनदा मारले होते, त्यासाठी पेपरची गुंडाळी वापरली होती. त्या गुंडाळीचा राग तिने पेपर टाकणा-यावर धरला असावा, असा आमचा कयास. पण भागवत परवा सांगत होता की, शेजारच्या गल्लीतलं एक दांडगं बंगलेबाज कुत्रंही त्याच्यावर कायम भुंकत होतं. त्याचं कारण काय असावं? कुत्र्यांचा एकूणच पेपरवर राग असतो का कायकी.
चिंकी तिच्या हयातीत कुणालाच चावली नाही. एकट्या भागवतवर मात्र ती सतत आठ दहा वर्षे भुंकत राहिली. तरीही तो तिच्याशी बोलत राहिला. ती गेली तेव्हा हळहळला.
अलीकडे भागवत पेपर कधी टाकून जातो हे कळतही नाही.
चिंकी गाईचे डोळे घेऊन आली होती.
ते डोळे मनात अजून शाबूत आहेत!

टिप्पण्या