सुधा राणा

आपल्या लेखनावर भरभरून प्रेम करणारा कुणी गेला की, लिहिणारा माणूस आतून उन्मळून पडतो. अस्वस्थ व्हायला होतं. सुधा राणा यांची माझी कधी भेटगाठ नाही पण त्या गेल्याचं कळालं आणि तसं झालं.

पद्मगंधा दिवाळी अंकातल्या एका लेखासंदर्भात २००६ च्या सुमारास त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. तेही पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे यांच्याच फोनवर. बस्स तेवढाच परिचय. पुढे काहीच नाही. ना त्यांचा नंबर माझ्याकडे होता, ना माझा त्यांच्याकडे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी त्या अचानक फेसबुकवर भेटल्या. तब्बल बारा वर्षानंतर. इनबॉक्समध्ये एकदोनदा बोलणंही झालं. पूर्वी त्या नागपुरात होत्या आणि आता गोव्यात स्थायिक झाल्याचं तेव्हाच कळालं. महाराष्ट्रातल्या ब-याच मान्यवर लेखक कलावंतांशी त्यांचा जवळून परिचय होता. त्यांच्याकडे अनुभवाचं भांडार होतं, मलाही ते ऐकायचं होतं. याच वेळी त्यांनी मला गोव्यात काही दिवस राहायला येण्याचे आमंत्रणही दिलं.

मला दोन गोष्टींचं आश्चर्य वाटलं, माझी त्यांची कधी भेट झालेली नाही, बारा वर्षांच्या अंतराने दोनदाच फोनवर बोलणं झालेलं आणि एवढ्याच ओळखीवर त्यांनी थेट कुटुंबासह गोव्यात येवून राहण्याचं आमंत्रण द्यावं! लिहिणा-या माणसांवर एखाद्याचा एवढा विश्वास असू शकतो? दुसरी गोष्ट, त्यांनी बब्रूची पुस्तके विकत घेवून अनेकांना भेट दिली होती. अभिनेता मकरंद अनासपुरे त्यापैकी एक. त्यातूनच एकदोनदा अनासपुरेंशी माझं बोलणं झालं. पण या गोष्टीचा सुधा राणांनी शब्दानेही उल्लेख केला नाही.

सुधा राणा यांची भेट राहूनच गेली. त्यांच्या बोलण्यात ‘एकटेपणा’ विषयी काहीसा उल्लेख होता; पण तो तेवढाच. कदाचित प्रत्यक्ष भेटीत त्या बोलल्याही असत्या. तेही राहून गेलं. ही गोष्ट आता मला कायम खुपत राहील.

टिप्पण्या