कृपया आहेर आणू नये....
‘कृपया भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नये’
अशा आशयाची एक ओळ अलिकडे बहुतांशी लग्नपत्रिकांच्या तळाशी अंग आखडून बसलेली असते. आपल्याकडे बघून ती छद्मी हसत असल्याचा भास आपल्याला होत असतो. भले मग ती लिहिणाराचा हेतू शुद्ध असेल आणि आपल्या मनात पाप असेल, पण ही ओळ सरसगट खरी असल्याचं काही केल्या पटतच नाही राव. !
पत्रिकेवर ही बया सहजासहजी आलेली नसावी. त्यामागे भरपूर विचार केला गेला असावा आणि खूप काही वर्ष जावू द्यावी लागली असावीत. या बदलाचा इतिहास बरा नसावा, त्यामागे काही तरी दुखती रग असावी, असंही वाटत राहतं. ज्याने कुणी सगळ्यात पहिल्यांदा ही ओळ टाकायला सुरुवात केली, त्याच्या पिढ्या न पिढ्या आहेराच्या भानगडीत पोळलेल्या असणार.
......
आहेराचे कपडे ही आपल्याकडे स्वतंत्र कॅटॅगिरी आहे. असल्या आहेरांच्या थप्प्याच्या थप्प्या बहुतांशी लोकांच्या घरात वर्षानुवर्ष साचून असतात. या कपड्यांचं धड काहीच शिवता येत नाही. शिवायला गेलं तर तो बेरकी टेलर, ‘आहेरातलै का?’ विचारून कुत्सित हसतो. आणि आपल्या अंगावरचे कपडे कुणीतरी काढून घेतल्याचा फिल यायला लागतो.
तात्पर्य असं की, प्रत्येकाला घरातली ही थप्पी कमी करण्याची आयती संधी कुणाच्यातरी कार्यात मिळत असते. मग जुने गठ्ठे सोडले जात असतात. मग तोच आहेर फिरत्या चषकासारखा फिरत राहतो. केवळ आणि केवळ या गोष्टीला वैतागूनच, ‘आहेरच नको’ चा विचार पुढे आला असावा.
कारण, काही न मिळाल्यापेक्षा काहीतरीच
मिळाल्याचं दु:ख अधिक वेदनादायी असतं.
........
पत्रिकाकर्ते या ओळीत व्हरायटी देण्याचा भरपूर प्रयत्न करतात, त्यात कौशल्याचा कस लावतात; पण काहीही करा, कितीही शब्द बदला, रंग बदला तरी त्याचा अर्थ तोच असल्याने ते सहजासहजी पचनी पडत नाहीच. केव्हाकेव्हा वाटतं, ही ओळ म्हणजे सतराशे साठ कारणं सांगणा-या पाहुण्यारावळ्यांसाठी घरचा आहेर तर नसावा?
आलेली पत्रिका वाचताना आपण त्या ओळीशी आलो की, पत्रिका पाठवणा-याचा मिश्कील चेहरा आपल्या डोळ्यासमोर यायला लागतो. आपल्या जीवाचं पाणी पाणी होतं. अपराधीपणाचे पुटंच्या पुटं अंगावर चढायला लागतात. ‘आहेराचं लफडं ठेवलेलं नाहीये, लग्नाला ये बरं’ असंच त्याचा चेहरा आपल्याला सांगत असतो. मग आपल्याला मनातून राग येतो. अरे, यापूर्वी आम्ही काय जुनेच आहेरं देत होतो काय?
........
खरं तर पत्रिकेवरच्या या ओळी आता आपण गिफ्ट समजूनच स्विकारल्या पाहिजेत. एखाद्या पत्रिकेवर तशी ओळ नसेलच तर, यजमानाकडून ती अनवधानाने राहून गेली असावी असंही आता आपल्याला गृहीत धरता आलं पाहिजे. एवढंच नाही तर आपल्यासोबतच्या चार लोकांना बुकेफिके घेण्यापासून परावृत्त करता आलं पाहिजे. त्यासाठी पर्यावरणाचं कारण देता आलं पाहिजे.
....
सरकार प्लास्टिक वगैरेवर बंदी आणत असतं, खरं तर त्यांनी आता असल्या आहेरांवरही बंदी आणली पाहिजे. किती तरी घरांच्या तुंबलेल्या जागा रिकाम्या होतील त्यामुळे. दुवा देतील लोक. बरं, टॉवेल- टोपी- उपर्ण आजच्या काळात कोण वापरतं राव? मग कशाला अट्टहास? टोपी वापरणारे ठळक दोघेच तर आहेत आपल्याकडे. त्यातला लौकिक अर्थाने एक नायक तर दुसरा खलनायक. एक मंदिरात राहतो तर एक जेलात. मग बाकीच्यांना का म्हणून द्यायच्या टोप्या? जुन्या गठ्ठ्यातून उपसून काढा, पुन्हा ठेवा, पुन्हा काढा, पुन्हा ठेवा. किती वर्षे करायचं हे?
.....
आपलाच आहेर चारपाच वर्षात आपल्यालाच परत आला की, माणसाने समजून जावं, आपल्या संपर्काचं वर्तुळ आटत चाललंय. इव्हन, संपर्कातल्या बाकी लोकांचंही वर्तुळ आखूड होत चालल्याचा तो सज्जड पुरावाच असतो. अशा वेळेस आपण सावध झालं पाहिजे. आपलं वर्तुळ मोठं करण्याचा, वेळ पडल्यास बदलण्याचा हा क्षण असतो. नातेवाईक, मित्रमंडळी, रामराम-नमस्कारवाले आपण पुन्हा एकदा तपासून घेतले पाहिजेत.
...
एक विशेष सूचना: चार घरं फिरून आपल्याकडे आलेल्या आहेराचा आपण तातडीने निचरा केला पाहिजे. बॅगाफिगात, दिवाणाफिवाणात, माळ्यावरफिळ्यावर, कपाटाकुपाटात गुदमरून गेलेले आहेर रात्री अपरात्री श्वास घ्यायला बाहेर पडतात म्हणे! त्यांच्या अंगमोड्यांचा आवाज भेसूर असतो. त्याला प्राचीन फील असतो. तो ऐकू नये असे म्हणतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा