साडीचा आग्रह
पहाटेची वेळ. रस्त्यालगतच्या बाकड्यावर बसलोय. पलिकडच्या बाकड्यावर एक महाशय माझ्यासारखेच एकटे बसलेत; पण अस्वस्थ असे. काही वेळ जातो. समोरून एक बाई येतात. बसतात. बहुधा जोडपं असणार. महाशय टम्म, बाई साधारण.
बाई धापा टाकताहेत. धापा थांबेपर्यंत वाट पाहण्याची महाशयांची तयारी नाहीयेय. ते लगेच खेकसतात, तुला म्हणालो होतो, लांब लांब पाय टाकत भरभर चल म्हणून. तुझं आपलं पावलं मोजत मुंग्याच्या गतीनं चालणं. शेवटी वाट पाहत इथे बसून राहिलोय केव्हाचा.
बाईंच्या धापा अजून संपलेल्या नाहीत. खेकस, धापा, खेकस, धापा असं क्रमानं चालू आहे. बाई न ऐकल्यागत आपल्या श्वासात गुंतलेल्या. महाशयांच्या बोलण्यात आशय तोच, आवेश तोच, फक्त शब्दांचा बदल.
बाईंच्या धापा आता संपत आल्यात. त्यांना तरतरी येते आहे. इकडं महाशयांचा खेकस थकून गेलाय. बाई वाट पाहताहेत, त्यांच्या एखाद्या वाक्याची. महाशय ती संधी देतातच. ते तोंड उघडताहेत तोच बाई पावलं मोजत चालावं तसं एकेक वाक्य मोजत बोलतात,
‘एकीकडून साडीचा आग्रह धरता आणि लांब पाय टाकत भरभर चल असंही म्हणता. कसं शक्यय? साऊथ इंडियन लुंगीसारखी वर मुडपून घेवू का साडी चालताना? चालेल का तुम्हाला ते? लुंगी डान्ससारखं? नाहीतर असं करा, तुम्हीच मला भरभर चालून दाखवा, अशी साडी घालून.’
......
पुढे अजूनही संवाद होणार असतो. जोडप्याच्या गप्पा या पातळीवर येतात तेव्हा ति-हाईतानं तिथं थांबू नये. मी उठतो. चालू लागतो.
गेल्या काही दिवसांपासून मी फारच नियमीत जातोय फिरायला. मला उगीचच असं वाटतंय की, त्या महाशयांनी बाईंचं आव्हान स्विकारलेलं असावं. न जाणो, आज ना उद्या ते भल्या पहाटे अंधारात साडीवर लांब लांब पाय टाकत भरभर चालून दाखवताना दिसतीलही!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा