एष्टीतले अंकल
बस निघालीये. फार रिकामी नाही, फार गर्दी नाही. सोय बघून कुठेमुठे प्रवासी बसलेले. मधल्या थांब्यावर एक मम्मी तिच्या पिल्लूला घेवून चढते. एक लंबुळकं रिकामं शीट त्यांचीच वाट पाहतंय.
मम्मीचं पिल्लू भलतंच बोलाळ. चढल्यापासून तोंडाला सेकंदभर फुरसत नाही. मोकळी बस पाहून ते अधिकच चेकाळलेलं. त्याला शीटवर उड्या मारायच्यात. दोन रांगांमधल्या हँडलला पकडून लटकायचंय. मम्मी करवादलेली. सोडायला आलेल्या नवऱ्याला, माझं मी बघते जागा, तुम्ही जावा म्हणालेली.
मम्मी वसकून बसवते पिल्लूला. तिला कुणाशीच बोलायचं नसावं. काही वेळ जातो. पिल्लू उलटं बसून हळूच मान वर करतं. मागे पेंगुळलेला एक अंकल. पिल्लू अंदाज घेतं. त्याला आपले हँडग्लोज दाखवतं. जुजबी प्रश्न विचारतं. अंकल बोलू लागतो. पाचेक मिनीटात दोस्ती वाढत जाते.
मम्मी मागे वळून अंदाज घेते. माणूस सज्जनै. पिल्लूला आता मागे जायचंय. अंकल शीटवर एकटाचंय. पिल्लू मम्मीला ओलांडून मागे येतं अंकलला ओलांडून खिडकीशी जातं. त्याला मस्ती करायचीये. ते मग हँडलला धरून लटकतं. उड्या मारतं. बोलत राहतं. आता अंकलच त्याची काळजी घेवू लागलेला.
नाही म्हणायला, मम्मी एकदोनदा म्हणते पिल्लूला, अंकलला त्रास देवू नकोस. नंतर थेट डोकं वर काढून मागे वळून, अंकलकडे पाहत म्हणते, अंकलची मुलगी नाही देत बघ असा त्रास. तुम्हाला मुलगी असेल ना. पहिलं वाक्य पिल्लूसाठी, दुसरं अंकलसाठी.
अंकल म्हणतो, छे हो. तीही अशीच खोडकरै.
म्हणजे अंकल विवाहितै, त्याला मुलगीये हे मम्मीचे दोन्ही अंदाज अचूक. मग तुम्ही काय करता, कुठं राहता. माझं माहेर, माझं शिक्षण वगैरे गप्पा एष्टीच्या धडधडाटात सुरू राहतात. पिल्लू आता मस्ती करून थकलंय. त्याला कुणीच अडवत नाहीयेय. आपण पटवलेला अंकल मम्मीशीच बोलतोय. आसपास नवा अंकल दिसत नाहीयेय. पिल्लू कंटाळून बसलंय.
अंधार पडत चाल्लाय. बसमध्येही शिरलाय. बस धावते आहे. वारली पेंटिंगमधली मुंडकी कापून खालीवर चिटकवावीत तसे शीटच्या वर आलेले काळे ठिपके अंधुक प्रकाशात बसभर डुलताना दिसताहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा