सुन्न पहाट
पहाटे भरधाव वेगात वाहणा-या कंपन्यांच्या गाड्या. त्यांचा छाती दडपणारा आवाज अगदी शेजारून स्पर्शून जातो. त्या आवाजाला लटकून मग आपणही दूरवर फरफटत जातो. पुढच्या प्रत्येक पावलागणिक त्यांच्या कंपन्यांतली धडधड आपल्या डोक्यात शिरत जाते.
त्या आवाजाच्या कचाट्यातून मोठ्या मुश्किलीनं बाहेर पडून आपण चालण्याच्या प्रयत्नात असतो तेव्हाच दूरवरनं अॅम्ब्युलन्सचा सायरन येऊ लागतो. आपण रस्त्याचा काठ पकडलेला. वॉवऽऽऽवॉव, सायरनचा श्वास खालीवर होत आपल्याला ओलांडून जातो. जातो कसला, अनेकानेक दवाखान्यांचे दारं झिजवत तो कुठल्याशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलाच्या फाटकाशी थांबल्याचं आपल्याला जाणवत राहतं.
आपण सुन्न. मग पेपरातल्या बातम्याच आपला पाठलाग करू लागतात. पहाटेच फिरायला बाहेर पडलेलं एक जोडपं. त्यातल्या एकाला गाडीने उडवलेलं.... एवढ्या क्षणात संपतं आयुष्य? निघताना दोघे निघतात आणि परतायचंय आता फक्त एकालाच? पहाटेची स्वप्न खरी असतात म्हणतात, पण मग जागेपणीच्या स्वप्नाचं काय? एखादी पहाटच अशी भयानक सत्य होवून समोर येते.
.....
पहाटपक्षी कुठं गेलेत भुर्रकन उडून? त्यांची किलबिल ऐकूच येत नाहीये आजकाल. उलटपक्षी असल्याच जीवघेण्या आवाजांच्या स्पर्शाने पहाट सरतेय.
शहराला हवा आहे, पक्ष्यांचा आवाजस्पर्श!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा