ऑडी ची गोष्ट

जुनी गोष्टै. शहरात निरनिराळ्या चारचाकी गाड्यांचं प्रदर्शन होतं. पेपरमधून त्याचा भरपूर प्रचार झाला होता. कुठल्या कुठल्या भारी गाड्यांचे फोटो छापून आले होते. गर्दी भरपूर होती. चिरंजीवही गेले होते. पाचवी सहावीत असेल.
प्रदर्शन पाहून आल्यावर मला गाड्यांची नावं, वर्णनं सांगून झाली. मग अचानकच म्हणाला, ‘बाबा, ऑडी काय जबरदस्त गाडीये. आपल्या कॉलनीत कुणीतरी घेतली पाहिजे. रोज पाहायला मिळेल.’
पुढे खरंच आमच्या कॉलनीत शेवटच्या टोकाला राहणा-या एका उद्योगपतीने ऑडी घेतली. त्यांच्याकडे ब-याच महागातल्या गाड्या होत्या. त्यांचा रस्ता आमच्या घरासमोरनंच पुढे जायचा.
....
घटना अगदी साधी आहे. आपण ऑडी घेवू शकत नाही वगैरे गोष्ट ठिकै; पण शाळकरी वयात त्याने, कॉलनीतल्या कुणीतरी ही गाडी घ्यावी असं म्हणणं म्हणजे आपल्या बाबाकडनं हे शक्य नाही, असं बापाच्या तोंडावर जाहीर करणंच झालं. जरी ते खरं असलं तरीही माणसाला इगो असतोच ना.
माझा इगो जरासा दुखावला गेला; पण तरीही समुदेशकाच्या ‘समजदार पालक’ अनुसार मी त्याच्या हो मध्ये मोठा हो मिसळला. नंतर मला मात्र एक प्रश्न पडला, माझं ठिकै; पण त्यालाही अशी गाडी आपल्याकडे असावी असं का वाटलं नसावं? त्याच्या वयात काहीही, अगदी अतर्क स्वप्न असू शकतात. त्यांना ती माफ असतात. त्याला त्यावेळी ‘मी घेईन एकदिवस’ असं नुसतं म्हणता आलं असतं.
आयुष्य हा सिनेमा नसल्याने, मी पुढे जिद्दीने, प्रचंड कष्ट करून ती गाडी घेतली आणि त्याचं स्वप्न पूर्ण केलं वगैरे प्रत्यक्षात घडत नसतं. घडलंही नाही. मराठी माणसं दळभद्रीच, त्यांना मोठा विचार करता येत नाही, त्यांची हिंमतच नसते वगैरे खिल्ली यावर उडवता येवू शकते किंवा या निमित्ताने मध्यमवर्गीय मानसिकतेवर खोचक विनोदही भरपूर करता येतील. ते होत राहील; पण मला कायम अस्वस्थ करणारी गोष्टै ही. ज्याचं काहीच उत्तर टप्प्यात नाहीयेय.
गाडी किंवा ऑडी हे तसं प्रातिनिधिक असतं. माझं स्वप्न बुलेटच्या पुढे गेलं नाही आणि त्याला मी स्वप्नच राहू दिलं. त्यांची स्वप्न निराळी असू शकतात. मोठेपणी ती बदलू शकतात. त्याचीही बदललेली असणार यात शंका नाही. मला सांगायचं असं आहे की, तुलनेत नव्या पिढीतले पोरं जरा जास्तच प्रॅक्टिकल झाले आहेत काय? त्याच्या वयात किती फुशारक्या मारायचो आम्ही. आजकालच्या पोरांना फुशारक्याही मारता येत नाहीत!

टिप्पण्या