आवळ्यामागची गोष्ट!


झाडाला आवळे लागायला सुरुवात झाली की, ते एवढे येतात की, नंतर त्याचं काय करावं हा प्रश्न पडतो. म्हणून आवळा लावावा की त्या जागी दुसरं काही लावावं असा प्रश्न होता. पण मग लावलंच. त्या मागे कारणही फार प्रबळ होतं.
......
साधारण आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. अरुणाचल प्रदेशात जाण्याचा योग आला होता. दौरा शासकीय होता. बोमदिलाहून हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट पाहण्यासाठी आम्ही साठेक किमी अंतरावर चाललो होतो. हिमालयाचा कठीण रस्ता. चहुकडे डोंगरद-या, त्यात दरड कोसळण्याची भीती. नेपाळी ड्रायव्हर होते. मिनीटामिनीटाला नागमोडी वळणं घेणा-या आणि चढउतराच्या रस्त्यावरनं गाडी चालवण्यात ते तरबेज असतात.
रस्त्यातून गाडी जात असताना एक वासरू आडवं आलं. थोडक्यात वाचलं, असं वाटलं; पण नाही. त्याच्या गळ्यातलं दावं गाडी खाली आलं आणि ते खेचल्या गेलं होतं. हे आम्हाला नाही कळालं; पण ड्रायव्हरला त्याची जाणीव होती. त्याने गाडी जोरात पिटाळली. काही किमी अंतरावर जात नाही तोच फटफटीवर बसून आमचा पाठलाग करीत दोन तरणेबांड पोरं आले. त्यांनी गाडी थांबवली, चावी काढून घेतली. ड्रायव्हरला खाली उतरायला सांगितलं. तो खाली उतरेना. त्यातल्या एकानं मग खिडकीतून हात घालून ड्रायव्हरच्या मानेवर डाव ठेवला. तसं त्याच्या मानेतून टचकन रक्त आलं.
मी ड्रायव्हरच्या मागेच बसलेलो होतो. आम्ही सगळेच घाबरलेलो. मी तो डाव बाजुला केला आणि ड्रायव्हरच्या मानेला हात लपेटला. त्याचा डाव माझ्या मनगटाला ओझरता लागला; पण रक्त काढून गेला. तो तरणाबांड पोरगा म्हणाला, साब आप मेहमान है. बिचमें मत आईये. मेहमान बनके रहिये.’
म्हणजे नेपाळी घरचा आणि मी मात्र मेहमान? बहुतेक त्यांच्यातलं नातं देशविदेशापेक्षा ‘हिमालयातली पोरं’ अशा अर्थाने अधिक जवळचं असणार.
वासराला दुखापत झाली असतानाही घटनास्थळावरून ड्रायव्हरने पळ काढल्याचा राग त्यांना होता, म्हणून ते अधिक चिडले होते. आमची आणखी एक गाडी पुढे गेली होती. त्यात स्थानिक अधिकारी होते. मग आमची फोनाफोनी झाली. ते परत आले. त्यांची चर्चा झाली. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कुणी ऐकायलाच तयार नाही. लगोलग त्यांचीही आणखी दोनपाच माणसं गाड्यांवर आली. ते वासरू आता जगणार नाही. ते जगलं नाही तर हाय खावून गायही जगणार नाही.. वगैरे वगैरे ते सांगू लागले. पैशांच्या वाटाघाटी होत्या. चर्चा खूपच लांबत चालली.
आजुबाजूला स्वर्गीय निसर्ग सौंदर्य. प्रचंड मोठं जंगल. त्यातून जाणारा तो रस्ता. एका बाजुला हजारो फूट खोल दरी दुस-या बाजुला चढत गेलेले अजस्त्र डोंगर. मधूनच एखादा धबधबा. त्याचा दूरपर्यंत पाठलाग करणारा आवाज. बघत राहावं, ऐकत राहावं असं.
त्यांच्यातली चर्चा कधी स्थानिक भाषेत तर कधी आसामीत चाललेली. आम्ही बसून कंटाळलो आणि पाय मोकळे करावे म्हणून चढण चढत गेलो. पुढे रस्त्याच्या कडेला वरच्या बाजुला एक आवळ्याचं झाड होतं. त्याच्या फांद्या खाली झेपावल्या होत्या. शाहू म्हणाला, चल, आवळे दिसताहेत. खावूत तोपर्यंत. आम्ही जवळ गेलो. उड्या मारून दोनपाच आवळे तोडले. आपल्याकडचे आवळे भलतेच टंच आणि टपोरे असतात. ते मात्र जंगली आवळे. प्रकृतीनं बेतास बेत.
चर्चेत बसलेला एकजण आमच्याकडे पाहात असावा. तो चर्चेतून उठला आणि आमच्या दिशेने येवू लागला. त्याच्या हातात डाव होता. तो आमची हालचाल न्याहाळत असावा. त्याला बघून आम्ही दचकलो. तो कशाला येतोय इकडे? आता काय होतंय की? आम्ही बघत राहिलो. तो आला. त्यानं आवळे तोडताहेत का विचारलं. आम्ही बहुतेक म्हटलं, हो, हाताला येतील तेवढे दोनचार घेतले.
आम्हाला ओलांडून तो पुढे गेला आणि गच्च झाडीतून त्या चढावर चढला. आम्ही त्याच्या दिशेने बघतोय तोवर आवळ्याचं आख्खं झाड आमच्या पुढ्यात येवून पडलं. त्यानं डावाच्या एका घावात ते खाली घेतलं होतं. मग तो त्या झाडीतून बाहेर आला. ‘अब ले लो, होना उतने’ असं म्हणत लगोलग चर्चेत सामील व्हायला निघून गेला.
.....
आम्ही एकवार त्याच्या पाठमो-या आकृतीकडे आणि एकवार तुटून पडलेल्या झाडाकडे बघत राहिलो. नंतर आमच्यासोबतची बाकीचीही मंडळी आली. आवळ्यांनी सगळ्यांचे खिशे भरले. झाडावर भरपूर आवळे उरलेच. आख्खं झाड कसं रिकामं करणार? त्या घनदाट जंगलात असे लाखोंनी झाडं असतील; पण आमच्यासाठी तोडलं गेलेलं आणि आकस्मात पुढ्यात येवून पडलेलं झाड, त्यावरचे उरलेले आवळे अजूनही डोळ्यापुढे येतात. त्यांचंच स्मरण म्हणून वाड्यातलं हे आवळ्याचं झाड.
त्याला कधी येतील ते येवोत आवळे!

टिप्पण्या