आणि नंतर...।
ऑफिसमध्ये असताना एकेदिवशी आवडते लेखक भारत सासणेसरांचा फोन आला. म्हणाले, ‘अरे, काय तुमच्याकडे एक रुपयाही नाहीयेय. देवू काय?’
म्हटलं, ‘सर, कळालं नाही. असं का म्हणताय?’
मग त्यांनी प्रकरण सांगितलं. झालं असं होतं की, ग्रेसनी दोन ओळींचं पत्र पाठवलं होतं. ते पत्र ग्रेसना परत गेलं होतं. मी मग चौकशी केली. तर कळालं असं की, ते आमच्या ऑफिसला आलं; पण त्याचा ड्यू म्हणून पोस्टमनने एक रुपया मागितला आणि आमच्या रिसेप्शनिस्टने ते घेतलंच नाही. अर्थातच मग ते परत गेलं आणि ग्रेस अस्वस्थ झाले. त्यांनी सासणेसरांना फोन करून हे सांगितलं.
सासणेसर मला म्हणाले, ‘जो काय घोळ असेल तो असेल. ग्रेसना ते आवडलेलं नाहीयेय. त्यांना लगेच फोन करा.’
मी संध्याकाळी फोन केला. ग्रेस म्हणाले, ‘दुस-यांची कुठलीही गोष्ट मी माझ्याकडे ठेवत नाही. तुमचं परत आलेलं पत्र मी आजच रजिस्टर पोस्टाने पाठवलं आहे. ते मिळेल तुम्हाला.’
ग्रेस आवडते. त्यांची सारी पुस्तके विकत घेतलेली. प्रत्यक्षात त्यांचं पत्र येणार म्हटल्यावर तर चक्क नागपुरात जावून ते घेण्याची आपली तयारी. एक रुपयांसाठी कोणता नतद्रष्ट परत पाठवेल ते? फोनवर मी त्यांना नेमकं काय झालं ते सांगण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना आता त्यात रस राहिला नव्हता. ते बाकीचं बरंच काही बोलत राहिले.
.....
त्यांनी पत्र पाठवण्याचं कारण असं होतं की, औरंगाबादेत परिवर्तन आणि नाथ ग्रुपच्या वतीने दिला जाणारा बी. रघुनाथ पुरस्कार ७ सप्टेंबर १९९८ रोजी लेखक भारत सासणे यांना देण्यात आला होता. त्याच्या वितरणासाठी ग्रेस आले होते. कदाचित ते औरंगाबादेत पहिल्यांदाच व्यासपीठावर आले असावे. त्यांना ऐकण्यासाठी-बघण्यासाठी प्रचंड गर्दी होती. याच कार्यक्रमात त्यांनी आरती प्रभू, जीए, ग्रेस यांच्याच साखळीतील भारत सासणे हे स्वतंत्र लेखक असल्याचं म्हटलं होतं.
त्यांच्या स्टेजवर येण्यापासून बोलण्यापर्यंत सारं काही भारावलेलं होतं. उर्दू, मराठी, संस्कृत, इंग्रजी अशा सा-याच भाषांतून फिरत असलेलं त्यांचं अस्खलित भाषण मंत्रमुग्ध करणारं होतं. मी तर प्रचंड प्रभावीत झालो होतो. परतल्या परतल्या त्यांच्यावर रविवार पुरवणीत एक लेख लिहिला होता. तो त्यांना पाठवला होता, त्यावर पोच म्हणून त्यांनी मला सदर पत्र लिहिलं होतं.
....
खरं तर त्याच कार्यक्रमात त्यांची भेट सहज शक्य होती; पण नको वाटलं भेटायला. आवडत्या लेखककवीला सहसा भेटू नये असं म्हणतात.
त्यानंतर एकदा ‘सामना’च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रेस औरंगाबादेत आले होते. लेखामुळे त्यांची किंचित का असेना ओळख झाली होतीच. डॉ. सुहास जेवळीकर म्हणाले, भेटून घे, त्यांनी आठवण काढली होती. मला तेव्हा छातीवर नागिन झाली होती. बोलता बोलता जेवळीकरांकडून त्यांना हे कळालं असावं. ते परत निघाले होते. ओझरती भेट झाली; पण बोलणार काय हा प्रश्न होताच. मग तेच म्हणाले, ‘कशीयेय नागिन?’ मी म्हटलं, ‘नागिन वरै, आत ग्रेसै. ती कितीशी टिकणार?’ ते हसले. बस्स!
.....
अंजली अंबेकर आणि विवेक गिरधारी हे त्याच कडीतले मित्र. अलिकडच्या काळात ग्रेस यांच्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर आणि मंगलवहिनी यांच्याकडून खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यामुळे तो लेख आणि त्यानंतची ही गोष्ट पुन्हा आठवली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा