१९९८ चं भारावलेपण!
सारे काही जीवघेणे!
‘.... आता ग्रेस बोलतील’
निवेदक सांगतो आणि मनकल्लोळात बुडालेल्या प्रेक्षागृहात गहिरी शांतता पसरते. बैठ्या व्यासपीठाशेजारी खुर्चीवर बसलेले आत्ममग्न ग्रेस, पाय जड झालेले, कुणीतरी हात देतं. ग्रेस उठतात. अस्वस्थ करणारा महावृक्ष तेवढीच अस्वस्थ पावलं टाकत माईकजवळ येतो. प्रेक्षागृहातील शेकडो श्वास आता रोखलेले. प्राण कानाशी एकवटलेला. वादळापूर्वीची, माणसं गिळून टाकणारी शांतता. कधी एकदा हा महाकवी बोलू लागतो आणि आपण धन्य होतो अशी सार्वत्रिक भावना. शांतता अधिकच गडद होते. ग्रेसची क्षणभरातली सारी हालचाल सा-या डोळ्यांनी हावरेपणानं टिपलेली. उत्कटता अधिक वाढते. अधिरता टिपेला पोहोचलेली. ग्रेस अजून काही मिनिटे बोललेच नाहीत तर माणसं उन्मळून पडतील असं वातावरण. ग्रेस बोलू लागतात.
वीज कडाडू लागते.
वादळ झपाटू लागतं.
महापूर लपेटू लागतो.
मेंदूला झिणझिण्या आणणारी अग्निशब्दं आघात करू लागतात. प्रत्येक वाक्य ठिक-या ठिक-या करणारे. ग्रेस मनात साठवता साठवता दमछाक होऊ लागते. एवढं प्रचंड वादळ आपल्या फुटक्या झोळीत कसं सामावणार? तासभर ही वीज कडाडते, अंतर्बाह्य जाळून जाते. आपणच आपल्यातून उन्मळून पडतो.
दृष्टी जाते.
श्रवणशक्ती संपते
वाचा तर कधीच गेलेली.
सारं अंधारून येतं. अस्पष्ट, अंधुक होऊ लागतं आणि ग्रेस आत शिरून मेंदूच पोखरू लागतात. अंगावर अणकुचीदार काटे येतात. मेंदू आता तडकलेला असतो. एका भयावह, अंधा-या जंगलातून, परतीची वाट नसलेल्या दिशेने जात आहोत.
सभोवती काही दिसत नाही.
ऐकू येत नाही.
शब्द मुके होतात.
तरीही वाट सुटत नाही.
आता आपणच आपल्याला तुकड्या तुकड्यात पाहतो.
ग्रेसचं स्वगत संपतं. प्रेक्षागृह जागीच ठप्प झालेलं. पुन्हा क्षणभर सन्नाटा. वादळानंतरची शांतता. बधिर झालेल्या खुर्च्याना जराशी जाग येऊ लागते. लख्ख प्रकाशाआधीचा अंधार दिसू लागतो. मेंदू शिणलाय. मरणाचा किंवा आत्महत्येचा एक क्षण देऊन गेलाय. बाहेर यावं, चष्मा काढावा. खळ्कन आवाज होईल अशा टणक जागेवर तो दाणकन आदळावा, फोडावा, कपडे टराटरा फाडावेत, भिंतीवर डोकं आपटावं, फोडावं, हात जेवढे आकाशाकडं झेपावू शकतील तेवढे शक्तीनिशी फेकावेत आणि... आणि एक प्रचंड मोठी, शांतता चिरत जाणारी गगनभेदी किंकाळी फोडावी. बस्स! बाजारू लेखनाची ऊर्मी आतच जळून तिची राख व्हावी, लेखणीचे सहस्त्र तुकडे करून भिरकवावेत आणि जी. एंचा प्रवासी होऊन पळत सुटावं, शेवटपर्यंत...... आणि नको असेल तर ग्रेसच्या स्वाक्ष-या घेत सुटावं, जळजळीत ताज्या अनुभवापेक्षाही आठवणी कवटाळत.
ग्रेसच्या स्वगतानंतरची ही टेरिफिक जाणीव. ग्रेसनी एकदा तरी आपल्याकडं बघावं आणि आपण पवित्र व्हावं, ही भावनाच मूळातून उपटून टाकणारा दाहक अनुभव. ग्रेसच्या स्वगतानंतर त्यांच्याकडं बघण्याचं धैर्य होत नाही, एवढं आतून तडवूâन गेलेलो. आता तर ग्रेसनीच आपल्याकडे बघू नये. चुकून माकून नजरानजर झालीच तर जागेवरच भस्म होऊन आपली राख होते की काय, याची साक्षात भीती!
आपण लिहितोच कशासाठी? माणसं लिहितातच कशासाठी? आपल्या वेदनाही दाहक असू शकत नाहीत? एवढ्या बोथट झाल्यात? आपली वेदना दाहक नाही, ही जाळत जाणारीच वेदना नाही का? आपलं असं वेदनारहित जगणं हीदेखील एक सतत आणि एकाकी प्रहार करणारी वेदना नाही का? अमुक एका गोष्टीचा अत्युच्च आनंद हीही एक वेदना नाही का? खुद्द ग्रेस हीच आपली व्याकूळ करणारी वेदना नाही का?
ग्रेस, तुम्ही व्यासपीठावर खरेच आला नसता तर बरं झालं असतं. तुम्ही कवी म्हणून आम्हाला हादरवणारे बरे होतात. आता तर उपटूनच टाकायला निघालात. आम्ही बाजारू का होईना लिहीत होतो ते बरं होतं, तुम्ही तर आमचे लिहिणारे हातच छाटायला निघालात. तुमचं हे असं अवेळी व्यासपीठावर येणं बरं नाही. ग्रेस! हजार मणांचं वजन असणारे तुमचे जीवघेणे शब्द आम्ही कसे पेलावेत ग्रेस? एवढे बलवान बाहू आम्ही कुठून आणावेत? महत्प्रयासानं जमवलेला शब्दांचा खेळ आम्ही असा अचानक आवरता घ्यावा? जाणिवेची दीक्षा देण्याची ही कोणती वेळ गाठलीत तुम्ही ग्रेस? प्राचीन माणसानं असं अचानक उद्भवू नये!
तुम्ही बोललात ग्रेस, खोल.... खोल दरीत आम्ही फोलपटासारखं कोसळेपर्यंत बोललात ग्रेस. ‘साजणवेळा’वाल्या चंद्रकांत काळेंचा सुसंस्कृत उच्चार तुमच्या शब्दांनी जळू लागला आणि त्यातल्या अर्थानं आम्ही पोळू लागलो. वल्र्डस्वर्थच्या ‘स्पॉन्टॅनिअस ओव्हरफ्लो ऑफ पावरफुल फिलिंग्स’चा खरा अर्थ तुम्ही अशा वेळी आमच्यावर भिरकावलात ग्रेस की, शेवटापर्यंत ही वेदना आमच्यात ठसठसत राहणार!
आणि शेवटी ग्रेस, तुम्ही असं नेमकं बोललात तरी काय? तुमचा एक तरी शब्द आम्ही पकडू शकलो? मेंदूच्या ठिक-या ठिक-या करून तुम्ही असं अधरच सोडून दिलंत आम्हाला.
पुन्हा एकदा तेच ग्रेस, तेच की, तुम्ही असं सांध्यपर्वातच व्यासपीठावर का आलात? आलाच नसता तर? आम्ही आमच्या दुलईत सुखानं राहिलो नसतो? व्यासपीठं माणसांची विटंबना करतात हे आम्हाला पुरतं कळायच्या आत ग्रेस तुम्ही व्यासपीठावर चढलात? कशासाठी? नटून थटून येणा-या प्रेक्षकांची विटंबना पाहण्यासाठी? आणि समजा ग्रेस, तुम्ही पूर्वीच असं व्यासपीठावर आला असता तर? आज जी. ए. असते तर... तेही व्यासपीठावर आले असते आणि बोलले असते? तुम्ही बोलता, तसंच काही ते बोलले असते? की तुम्ही बोलता, तेच जी. ए. बोलताहेत? असाच काहीसा किंवा हाच हाच अनुभव, काळीज चिरत जाणारा, जाळत जाणारा!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा