आपली गाडी निंबाखाली

आपण रिक्षातून उतरतो तोच बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराशी ट्रॅव्हल्सवाल्यांचा, टॅक्सीवाल्यांचा घोळका. ‘साब पुना जा रे क्या. एसी गाडी है, शिवनेरीसे कम भाडा है. नॉनस्टॉप पुना....’ वगैरे वगैरे.
आपण मस्तीत. खांद्यावरची बॅग गळ्यात लटकावून घेतो आणि ‘आमचं प्राधान्य यष्टीला’ वगैरे भाव चेह-यावर आणत त्याला बेदखल करतो. आत पुण्याला जाणा-या ब-याच गाड्या. तिकिटासाठी भली मोठी रांग. आपण रांगेला चक्कर मारतो. हा धटिंगण रांगेत घुसतोय का काय अशा नजरेने सा-या रांगेखोरांचे लक्ष आपल्याकडे.
आपण रांगेची प्रदक्षिणा पूर्ण करतो. आपल्याला पुण्याला जायचंच नाहीयेय. मूळात आपल्याला इथून कुठंच जायचं नाहीयेय. आपल्याला जिथं जायचंय ते ठिकाण मूळ प्रवाहात येत नाहीयेय. आपल्याला दरवेळी कंट्रोलर सांगत असतो, तुमची गाडी तिकडे, निंबाखाली उभी राहते.
साडेबाराची गाडीयेय. दीड वाजून गेलाय. सूर्य आग ओकतोय. निंबही आता सावली सोडण्याच्या तयारीत. बसस्थानक आणि डेपोच्या किना-यांवर हे निंबाचं झाड. पाय जडावून गेलेत. कुणीतरी म्हणतं, गाडी पिंपळाखाली लागेल बहुतेक. मग आपण पिंपळाखाली. पिंपळाची सावली तर कधीचीच पानगळीत गळून गेलीये.
ना पिंपळ, ना निंब, बस मुतारीच्या मागे उभी करून ड्रायव्हरसाहेब गायब. कुणा प्रवाशाला ती दिसते आणि काही क्षणात गर्दी तिकडे. गाडी तापलेली, आत प्रचंड गर्दी. आपण दांड्याला धरून उभे. तो दांडाही तापलेला. अंगातून घामाचा पाऊस यथेच्छ बरसतोय.
अजून तर खूप काही भोगायचंय. गावाकडे जाणारे सगळे रस्ते खोदून ठेवलेले. त्यांचं काम होणारै. यष्टीच्या खिडक्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावाच्या. तुम्ही कितीही बंद करा, त्या धुळीसाठी उघडणारच. आपल्या घामात, ती धूळ बांधकामावर सिमेंट फवारल्यासारखी हक्काने वस्तीला थांबलेली.
....
आपल्याला देवीच्या यात्रेला जायचंय. कितीही त्रास झाला तरी आता यष्टीच्या नावानं, सरकारच्या नावानं मनात शिव्या घालायच्या नाहीत. किरकिर करायची नाही. सकारात्मकच विचार करायचा असं आपण मनाशी ठरवतो. त्यासाठी मुद्दे शोधू लागतो. हां, आठवलं. बसस्थानकावर उतरल्या उतरल्या आपल्याला बरेच एजंट ‘साब पुना जाना है क्या’ वगैरे म्हणून विचारत होते.
भले आपण वर्षानुवर्षे निंबाखाली उभे असोत; पण दुस-यांना आपण पुण्याला जाणारे वाटतो आहोत ही सुखद गोष्ट नाही का? म्हणजे अजून बरेच चांगले दिसतो आहोत आपण. अजून चांगलं राहिलं पाहिजे, शरीर मेन्टेन केलं पाहिजे. योगा लावला पाहिजे वगैरे वगैरे स्फूर्तिदायक विचार मग आपल्यात वास करू लागतात.
गाडीत दोन जणांच्या शीटवर अडीच माणसं बसलेली. आपणही आता एका शीटच्या अर्ध्या माणसांपैकी एक. आपला आर्धा पाय अधांतरी; पण शेजारी उभ्या असलेल्या दोन जणांनी तगून धरलेला. त्या बदल्यात त्यांना त्यांची पाठ आपल्या डोक्यावर खाजवायची परवानगी आपण नकळत दिलेली. आधारासाठी त्यांचा हातबदल कायम आपल्या डोक्याला भिडून पुढे गेलेला. सगळं अनिवार्य.
.......
दरवेळी बसस्थानकावर आलं की, फलाटावर दिमाखात उभ्या असलेल्या पुण्याच्या गाड्या आपल्याला खुणावतातच; पण आपली तीव्र भावना निंबाखाली उभे राहण्याची असते. आपल्या आधीची पिढी अट्टहासाने गावाकडं राहिलेली. आपल्या नंतरची पिढी अपरिहार्य म्हणून पुण्याकडे सरकलेली. आपण मनानं कायम बसस्थानकावरच असतो. दोन्ही गाड्यांत आपण कायम शीटं धरून ठेवलेली असतात. एक पाय इकडे, एक पाय तिकडे!
गावाकडचं वय घटत असतं, शहराकडचं वय वाढत असतं आणि आपण यष्टीत असतो!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा