आतला आखाज्या!

वाटणीत येणारा एक आंबा होता, त्याचं नाव आखाजा. अक्षय तृतियेला तो यायचा म्हणून आखाजा. अंगापिंडाने डेरेदार. दोनतीन कोसावरनं तो सहज दिसायचा. खूप पूर्वी तिथं आमचं शेत होतं म्हणे, त्यात तो होता. घरातले म्हणाले, आखाजाला एकदा बघून ये!
आखाजा म्हणजे बघताच नजर लागावी असा. उंचीला असा की, वर बघितलं तर नजर ठरणार नाही. आणि पसरलेला असा की, बिना मांडवाचं एखादं कार्य सहज उरकून घ्यावं. त्याचं फळ मिठ्ठास; पण रंग मात्र कच्च्या कैरीसारखाच. पिकलो म्हणून पिवळं होण्याचं नाटक आखाजाच्या स्वभावात नव्हतं. जो आहे तो असा आहे, हेच त्याचं सच्चेपण.
पहिल्या भेटीतच आखाजा आवडून गेला. तो झाड वाटलाच नाही, खूप दिवसांनी कोणी आप्त भेटावा असं त्याचं दिसणं होतं. त्याचं नावही ‘आज्या’चा फिल देणारं तर रूप डोळ््यात साठवून ठेवावं असं. पुढे दर मोसमात त्याची भेट व्हायची. त्याला फळं खूप लागायची. रसासाठी बाहेरून आंबे विकत घेण्याची वेळ त्याने कधी येऊ दिली नाही. घरात त्याची अढी घातलेली असे. एरवी सुरपारंबी खेळण्यासाठी त्याच्या फांद्या चढायला सोप्या होत्या.
आखाजा उतरवणारं एकच कुटुंब होतं. मोसमात आखाजावर चढायचा मान त्यांचाच. आखाजाच्या सा-या खाचाखोचा, चढण्याच्या जागा त्यांना माहीत होत्या. शेंड्यावरचा आंबा टिपायचा असेल तर कुठून गेलं पाहिजे याचं गणित या कुटुंबातल्या सदस्यांना होतं. आखाजाचीही त्यांच्यावर भारी माया होती. असं वाटायचं की, आखाजा स्वत:च खाली झुकून त्यांना आंबे तोडायला मदत करतोय की काय. बरं हे कुटूंब त्यावर चढायचंही हलक्या पावलानं. वडिलधा-या माणसाच्या अंगाखांद्यावर एखादं लहान लेकरू जसं चढतं तसंच. आंबा उतरवण्याची त्यांची भोवनी आखाजापासून सुरू व्हायची. म्हणून आखाजावर त्यांची विशेष श्रद्धा.
आंबा उतरला की त्याची भलीमोठी रास लागायची. मग वाटणी सुरू व्हायची. आधीचा मालक, नंतरचा मालक, आताचा मालक, तोडकरी अशा काय काय पद्धतीनं वाटणी व्हायची. फाडेच्या फाडे चांगले आंबे इतर वाटेक-यांना जायचे. आमच्या वाटणीपर्यंत तर आंब्याची रास संपत आलेली असायची. शेवटी शेताचा मालक म्हणायचा, ‘गुरू आंबे मोजून घेवा.’
सगळ््यात आपला वाटा कमी म्हटलं की, कसंसंच व्हायचं. तोडक-याचा वाटा जास्त असायचा. पण तरीही जेवढा केवढा वाटा यायचा तोही खूप असायचा. तेवढाच घरी कसा न्यायचा याची चिंता असायची. पाठीवर गोणी टाकून न्यायची म्हणजे अंग थरारून जायचं. सा-या गावाचं पाणी पांदीत सोडलेलं. पांदीत चिखल झालेला. हागंदारी ओलांडून, चिखल तुडवत यायचं म्हणजे अंगाचा दगड व्हायचा. अजून कमी वाटा आला असता तर बरं असं वाटून जायचं. चिखलात स्लीपर कायम सटकायची. गोनी सटकली आणि उपडी झाली तर?
पुढे गाव सुटल्यावर तर केवळ आंब्यासाठी गावाकडं जायला जीवावर यायचं. वाटायचं, भाड्याच्या पैशात तर इथे भरपूर आंबे येतील. तेवढ्यासाठी तिथे कशाला जायचं? पण इकडे शेजारी म्हणायचे, तुमचं काय ब्वॉ, तुम्हाला गावाकडनं आंबा येतो. मग पाचट गोळा करून पलंगाखाली त्याची अढी घालायचं सुखही निराळं वाटायचं. दुसरा एक भावनिक भागही होता, आपल्या वाडवडलांचा मान ठेवला पाहिजे.
झाडं हेच एकमेव माणसांचे जिवंत पूर्वज असतात!
....
खरं तर मध्यंतरी एक वर्ष तो आणायला जमलं नाही; पण ते दिवस अस्वस्थ करणारे होते. वाटायचं, आपण गेलो नाही तर आखाजाचे मूळं आपलं घर शोधत इथपर्यंत येतील. फळं न्यायला का आला नाही म्हणून तब्येतीची चौकशी करतील. आपल्या पोराबाळांना घंटाभर कुशीत घेतील. जुन्या गोष्टी सांगतील. त्यांच्या अंगावरनं भलाथोरला हात फिरवतील. दोन घोट पाणी पिऊन आल्यापावली निघून जातील...
दुस-या वर्षीपासून मग आखाजा आणायला पुन्हा सुरू केलं.
आखाजा वीसेक वर्षापूर्वी भिरूड पडून गेला. आधी आतून पोखरत गेला. तरी पुढची दोन वर्ष त्यानं तग धरला. आता असं वाटतं, त्याची कोय तरी आपण जपून ठेवायला पाहिजे होती. ती कोय रुजवता आली असती. किमान त्याचा वंश आपल्या सहवासात वाढला असता.
केवळ माणसंच नव्हे, तर झाडांची किम्मतही आपल्याला ते गेल्यानंतरच कळती का कायकी!
( ता. क. आखाजा गेला त्या काळात माणसांचेच फार फोटो निघत नव्हते, तर झाडाचे कसे निघणार? सबब, फोटोतलं झाड निनावी असून आजच्या दिवसापुरतं त्याला आखाजा समजू या!)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा