मनीप्लांट, पुस्तके, पेंटिंग्स आणि बर्दापूरकर

एखादाच नशीबवान मनीप्लँट असा असतो की, त्याला इझी चेअरमध्ये आराम फर्मावणारी अशी ऐटबाज बाटली मिळत असते.

तुलनेत आपल्याकडच्या बाटल्या म्हणजे मनीप्लँटने स्वत:च चारचौघात मान खाली घालून बसावं अशा. ना त्या बाटलीचं मूळ आपल्याला माहीत असतं ना कूळ. बस्स, त्यात पाणी बसतं, तिचं बूड नीट टेकतं एवढ्याच निकषावर तिची निवड झालेली असते.

बरं, ऐटबाज बाटलीत मनीप्लँट लावणारांकडे आणखी ब-याच बाटल्या असूही शकतात. वेळ आली तर त्या आपल्याला मिळूही शकतात; पण तेवढ्याने भागत नाही ना. तिचं वैभव तोलून धरणारं आजूबाजूचं नेपथ्य आपण कसं उभं करणार?
......

फोटोत दिसतेय नुसती बाटली आणि त्यातला मनीप्लँंट; पण त्या भोवतीचं जे काही चित्र असतं ते अधिक देखणं आणि समृद्ध करणारं असतं. ज्यावर ही बाटली विराजमान असते, ते असतं पुस्तकाचं, खास बनवून घेतलेलं रेखीव कपाट.

त्याच कपाटाच्या भाऊबंदांनी इतर तीन भिंती व्यापलेल्या असतात. दुर्मीळ स्मरणिकांपासून सन्दर्भग्रंथापर्यंत आणि जुन्या कसदार लेखकांपासून नव्या लेखकांपर्यंत अनेकांची उपस्थिती तिथे असते. आकारानुसार त्यात सारी पुस्तके हारीनं मांडलेली असतात.

पुस्तकांची मांडणीही मालकाच्या स्वभावासारखी ऐसपैस असते. आहे त्याच कप्प्यात दाटीवाटीनं अजून एक गठ्ठा कोंबलाय किंवा पुस्तकांच्या उभ्या रांगेवर पुन्हा एक आडवी चळत ठेवलीये, असं चित्र इथे आपल्याला बिलकुलच दिसत नाही. प्रत्येक पुस्तकाला कंफर्टेबल वाटेल, पुरता श्वास घेता यावा अशी मोकळी जागा.

कपाटावर काही स्मृतिचिन्ह, काही फ्रेम्स, शिल्प नजाकतीने मांडलेली.

भिंतीवर नवीजुनी छोटीमोठी पेंटिंग्स. एकूण बैठकीतल्या प्रत्येक कोप-यात, प्रत्येक जागी घरमालकाची रसिकता पदोपदी जाणवत राहते. आल्यागेल्यानं सहज नजर फिरवली तरी त्याला खडा लागू नये अशी नेमकी रचना.

टेरेसवर डोकावण्याइतके तुमचे संबंध असतील तर तिथे सोनचाफ्यापासून ते मोग-यापर्यंत छोटीशी फुलांची बाग असते. त्या कुंड्यांसाठीही हटके स्टँड असतात. मोजक्याच कुंड्या; पण प्रत्येकानं मालकाची आवड जपलेली.

या बैठकीत राजकारण, समाजकारण, साहित्य, प्रशासन, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातल्या दिग्गजांचा राबता असतो. इथले विषयही त्याच उंचीचे असतात. विद्वत्तेचं वलय या बैठकीला व्यापून असतं.

सध्या तब्येतीने काहींसा नाजूक झालेला यजमानाचा हळवा कोपराही या बैठकीत बसून असतो. गप्पांत मनापासून सहभागी असलेला; पण एखादा शब्द अडला किंवा काही संदर्भ विसरला तर तेवढी माहिती पुरवणारा. बाजूला मेजावर औषधे. मोबाईलमध्ये औषधांच्या वेळासाठी अलार्म लावलेला. समोर टीव्ही सुरू असतो. त्यावर कधी स्पोर्टस चॅनेल असतं तर कधी रेसिपीज...
.........

पुस्तकं, पेंटिंग, शिल्प, झाडंझुडपं जिथं एकत्रित नांदतात, ती जागा कुणाला आवडणार नाही? इथल्या गप्पाष्टकांचं मला प्रचंड आकर्षण आहे. तिथं चालणारी प्रत्येक गोष्ट ऐकावी, मनात साठवावी असं वाटत राहतं. जेव्हा केव्हा संधी असते तेव्हा ती मी सोडत नाही. मला या माणसाच्या लाईफस्टाईलचा, जनसंपर्काचा आणि विविध स्तरातल्या मित्रमंडळाचा प्रचंड हेवा वाटत आला आहे. एखाद्या गोष्टीचं कौतुक करताना असो की, अतिथ्य करताना असो त्यांच्यातली श्रीमंती मला कायम भावत आली आहे.

एक काळ असा होता की, दूरवरनं मी त्यांना बघायचो, त्यांचं वाचायचो. त्यांनी निवडलेल्या विषयाचं, शैलीचंही मला आकर्षण होतं. सुदैवाने अलीकडे ब-याचदा त्यांच्या भेटीचा योग येतो आहे. काही माणसं खूप उशीरा तुमच्या आयुष्यात येतात, तेव्हा वाटतं, पूर्वीच त्यांची ओळख असती तर कदाचित आपलं अजून वेगळं आयुष्य असतं. पण अशा वाटण्याला अर्थ नसतो. त्यापेक्षा या माणसांचा उशिरा का होईना; पण सहवास लाभतोय हेही थोडके नसते!
....

असो. मनीप्लँटसाठी बाटली मिळवता येते; पण तिच्याभोवती असलेले काळाचे समृद्ध ठसे असे सहजासहजी उमटत नसतात. पत्रकारितेतली अनेक वर्षे, देशविदेशातील दौरे, जवळून पाहिलेलं देशाचं राजकारण असं सगळं सगळं पार पडल्यानंतरचा एक परिपक्व गंध या बैठकीला आलेला असतो. तो समजून घेता आला तर आपलीही वाटचाल नेमक्या दिशेने चालल्याचं समजावं.

सदरहु घर ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकरांचं असतं!

टिप्पण्या