प्राजक्त

मला पारिजातक मनापासून आवडतो. त्याचा सडा आणि त्याचा दरवळ.. आऽह... फक्त त्याचं प्राजक्त हे नाव जरा शिष्ट वाटतं. शिवाय त्याचं जुनाट खोडही मला भीती घालतं, थरार चित्रपटातल्यासारखं भयाण असतं ते.
अगदी फार पूर्वी दुसरी तिसरीत असताना मुळे नावाचा माझा मित्र होता कळंबला. त्याच्या घरी होतं पारिजातकाचं झाड. तिच त्याची माझी पहिली ओळख. त्याच्याकडून मी सणासुदीला पूजेसाठी फुलं आणायचो. त्यावर चढायला, फांदी हलवून फुलं पाडायला मजा वाटायची.
नंतरच्या काळात त्याची ओळख वाढत गेली. माझ्याकडे दारात होता तो, त्याचा सडा ओट्यावर पडायचा. चिकचिक व्हायची; पण त्याच्या गंधात ती सहनही व्हायची. नंतर तो अचानकच वाळला आणि गेला.
आम्ही जायचो त्या हॉटेलला लागून एक घर होतं. त्या घरातला पारिजातक तर एवढा विस्तारलेला होता की, त्याचा भला मोठा पसारा हॉटेलच्या लॉनवर डोकावलेला असायचा. त्याची धुंदी हॉटेलभर पसरलेली असायची. आमच्या कॉलनीतही एक पारिजातकाचं झाड होतं. त्या झाडाखाली रात्री एक कार पार्क केलेली असायची, त्या कारचं छत सकाळी फुलांनी अच्छादलेलं असायचं. सकाळी फिरायला जातांना ते बघणं हाही एक आनंदाचा भाग असायचा.
वर्ष, दोन वर्षांपूर्वी एका कबरीशेजारी मी पारिजातकाचं झाड पाहिलं, जरा कमरेत वाकलेलं. फुलांचा मोसम होता. आख्खी कबर भरून त्याचा सडा होता, जणू एकट्या त्या कबरीच्या मालकीचंच ते झाड असावं. नाही म्हणायला शेजारच्या कबरीवर त्यातली दोनपाच फुलं उडून पडली होती; पण ती केवळ शेजारधर्म म्हणून. कबरीवर टेचात विसावलेली ती फुलं बघून पहिल्यांदा मला कसंसच झालं. मी वर झाडाकडे पाहिलं. झाड बघताना, नेमकं काय झालं सांगता येणार नाही; पण ते झाड मला फारच मिश्कील वाटू लागलं.
कबर असो की समाधी त्यांच्या शेजारची झाडं आपल्या उराशी किती कायकाय बाळगून असतात. शेकडो लोक ते स्थळ बघायला येणार, बघून मनातला इतिहास चाळून बघणार आणि दुसरीकडं, इथल्या झाडांच्या मूळांना मात्र खाली नेमकं काय आहे हे कळत असणार. अशावेळी त्यांचे आपल्याकडे बघण्याचे भाव कसे असतील? एकतर, फारच अभिमानाने ते आपल्याकडे पाहत असणार. तुम्ही वर जे हे बांधकाम पाहताय, नक्षीकामाचं कौतुक करताय, त्याच्याखालपर्यंत आमची थेट पोहोच आहे. तिथं नेमकं काय दडलंय हे आम्हालाच माहीत. किंवा मग त्यांचे भाव मिश्किल तरी असणार. अरे, नुसतं वरंच दिसतंय हे, खाली काहीच नाहीये रे. त्याची कधीच माती झालीये वगैरे...
काही तरी संवाद असणारच या झाडांच्या मनात, शंभर टक्के!
फार्फार आतून जाणून घ्याव्या वाटतात अशा मिश्कील गोष्टी; पण ते केवळ अशक्यच!
च्यायला, माणूस म्हणून आपल्या फारच मर्यादा आहेत. भाषा आणि प्रांत यांच्या फार पुढे जावून काही अनुभव घेताच येवू शकत नाहीत आपल्याला. फार तर माणसाशी जुळवून घेतलेले जे कोणते प्राणी आहेत, तिथपर्यंत ही मर्यादा वकुबानुसार आपण लांबवू शकतो, बस्स!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा