बोगनवेल नाचणवेल

माझ्या गावाकडं जाताना रस्त्यात नाचणवेल नावाचं गाव लागतं. एकदा एक नवखी तरुणी बसमध्ये चढली. तिला त्याच गावी जायचं होतं. कंडाक्टर म्हणाला, कुठं जायचंय? ती म्हणाली, नाचणवेली.
तिने तसं म्हणताच नेहमीच्या प्रवाशांत खसखस पिकली; पण त्या उच्चाराने माझी तार दुसरीकडेच लागली. तिने एक वेलांटी काय दिली, माझ्या नजरेतून ते गाव एकदमच बदलून गेलं. वेलींनी वेढलेली घरे आणि फुलांच्या सड्याने माखलेला रस्ताच मला दिसू लागला. तिने दिलेली वेलांटी अशी एकदम हिरवीगच्च झाली.
या भागात ती पहिल्यांदाच प्रवास करत असल्याने तिला गावाच्या नावात वेलीचा काहीतरी संदर्भ असावा असं वाटणं साहजिकच होतं. तिनं ते उच्चारलं. मला वाटू लागलं, आपण इतकी वर्षे इथून प्रवास करतोय आणि आपल्याला एकदाही नाचणवेलचं नाचणवेली करून बघावं का वाटलं नसावं?
त्या गावातून बस जाताना खरं तर एकही वेल दिसत नाही. तरीही त्या गावाचं नाव नाचणवेल का पडलं असावं मला माहीत नाही. शिवाय आपल्याकडं ‘नाचणवेल’ असं कुठल्याच वेलाचं नाव आजवर तरी माझ्या ऐकण्यात नाही. मग हे कुठून आलं असावं? असेल त्याचा काहीतरी इतिहास; पण नाचणवेली हे नाव मात्र मला फार आवडून गेलं.
जाई, जुई, सायली, मधुमालती, संक्रांत अशा कितीतरी वेली आपल्याकडे आहेत. त्यांची नावंही आपल्याच भाषेतील. या वेलींत अलिकडच्या काळात अजून एक नाव समाविष्ट झालंय, ते म्हणजे बोगनवेली. खरं तर ‘बोगनव्हिला’वगैरे काहीतरी नावाचं आपण बोगनवेल केलंय. वेल म्हणावा असा नाजूकपणा त्यात कुठल्याचं अंगानं दिसत नाही. शिवाय तिला गंधही नाही.
बोगनवेलीची कधीकधी भीतीही वाटते, ती यासाठी की, एखाद्या मोठ्या झाडांशी लगट करत हलक्या पावलाने ती वरवर चढत जाते. नंतर त्याच्याच आधारानं त्याच्या नकळत अंगभर फांद्यांचं जाळं विणत जाते. आपण जखडले गेलो हे कळायच्या आत तिने झाडाच्या शेंड्यावर आपला झेंडा फडकवलेला असतो. बोगनवेलीच्या मोहात अशी भलीभली झाडं दिसेनाशी होतात, दिसतात ती फक्त खोडं.....
तरीही एक खरं की, बोगनवेलीच्या फुलांनी आख्खं झाड उजळून निघतं. असंख्य रंगातले तिचे घोस लक्ष वेधून घेत असतात. फुलं कागदी वाटत असली तरी कंपाऊंडलगत असलेली बोगनवेली बंगल्याला रौनक आणते. तिचे दणकेबाज काटे सहसा कुणाला जवळ फिरकू देत नाहीत. पहा; पण दूरून, असा तिचा स्वभाव.
माझ्याकडे प्रवेशद्वाराच्या समोर लाल, पांढरा आणि पिवळा असे तीन रंग आहेत. एकमेकांत मिसळून ते कंपाऊंडच्या आतबाहेर डोकावत असतात. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात पाण्याअभावी बहुतांशी झाडं सुकली; पण बिनपाण्याची बोगनवेल मात्र बहरात आहे. या काळात आजूबाजूला सारं भकास वाटत असताना तोच एक दिलासा असतो.
दुपारी तिचं रूप निराळंच असतं. संध्याकाळी- रात्री उशीरापर्यंत ओट्यावर किंवा अंगणात खुच्र्या टाकून आपण बसलेले असतो. बाहेर छायाप्रकाशाचा खेळ चालू असतो आणि आपल्या बोगनवेलीच्या सावल्या घराच्या भिंतीवर दिसू लागतात. वा-याची झुळूक आली की, त्याच्या एकात एक गुंतलेल्या आणि वरच्या दिशेने जावून खाली झुकलेल्या फांद्या भिंतीवर अक्षरश: नृत्य करू लागतात. हे दृष्य अत्यंत मोहक असते. रंगमंचावर कार्यक्रम चालूये आणि आपण समोर बसलेले प्रेक्षक आहोत असं फिलिंग तेव्हा येत राहतं. अक्षरश: वेडावून जातो माणूस. तुमच्या गप्पांना अचानक ब्रेक लागतो आणि सारे पाहू लागतात.
सांगण्याचं तात्पर्य, बोगनवेलीचं दिसणं, वागणं आणि नाचणं बघून तिला ‘नाचणवेली’ हे देशी नाव का बहाल करण्यात येवू नये असं मला सारखं वाटत राहतंं. माझ्यापुरतं तरी मी ते दिलंय बुवा.

टिप्पण्या