पाय बाय...
वर्गात एक देखणा मित्र होता. रंग अगदी उजळ, सगळ्यांत उठून दिसावा असा. आवाज मात्र नाजूक. मिसरूड नव्हतं फुटलेलं अद्याप. वर्गातल्या पोरींशी त्याचं चांगलं जमायचं. बाकीच्यांना आसूया वाटायची.
वर्गात पोरांचं एक टोळकं होतं. त्यांना तो बायकी वाटायचा. गणिताच्या तासात एकदा ‘पाय बाय सिक्स’ आलं आणि टोळक्याला शब्द सापडला. त्यांनी ‘पाय बाय ...’ म्हणून त्याचं नावच ठेवलं. आधी त्यांच्या त्यांच्यात चालायचं; नंतर ते सगळ्यांतच पसरलं. टोळक्याला पुढे चेव आला.
त्यांनी, पाय बाय आला नाही आज, पाय बाय तर आज फॉर्मात दिसतोय, अशाच भाषेत बोलायला सुरू केलं. ते टोळकं सोडून इतर कुणी त्याला तसं म्हणायचं नाही; पण टोळक्याच्या प्रश्नाला हो किंवा नाही असं उत्तर देणे म्हणजे मान्यता देण्यासारखंच होतं. हळूहळू त्याचं ते नावच पडून गेलं. वर्षभरात तर त्याला स्वत:लाही या नावाची सवय झाली. मग पोरांची सवय मोडून गेली. त्या शब्दाला त्याचा अर्थच सोडून निघून गेला.
तर त्याच दरम्यान, मी एक कथा लिहिली होती. त्यात ‘पाय बाय..’चा ओझरता उल्लेख होता. नावं कशी पडतात अशा अर्थानं. ती कथा छापून आली. त्यानेही वाचली. हसून दादही दिली. आमची दोस्ती कायम राहिली.
......
नंतर कॉलेज संपलं. मी गावही सोडलं. सतरा अठरा वर्ष निघून गेली. एकेदिवशी शहराच्या बसस्थानकाबाहेर तो अचानकच भेटला. अगदी तसाच गोरापान. तिथंच रसवंतीजवळ उभं राहून आम्ही बराच वेळ बोललो. आठवणी काढल्या. त्याला गावी परत जायचं होतं. गाडीला वेळ होता.
त्याला म्हटलं, घरी चल ना. नंतरच्या गाडीने जा. तो म्हणाला, नाही. तूच आत बसस्थानकात चल. गाडी लागेपर्यंत बोलूत. शिवाय तुझी एक ओळखही करून देतो. बरं वाटेल तुला.
मी म्हटलं, आतमध्ये का वहिनी बसलेल्या आहेत काय? कमालै तुझी. त्यांना एकट्याना बसवून इथे बोलतोयेस.
नाही रे. बायको नाही. मुलगीये. तिला बसवून आलोय. गाडी लागेलच इतक्यात.
अरे, आधीच सांगायचं ना मग. जा, मुलगी वाट पाहत असेल. नंतर भेटुयात. मीही जातो आता.
असं काय करतोस. चल ना. मुलीशी ओळख करून देतो. तिलाही बरं वाटेल आपल्या बाबाच्या कॉलेजमेटला बघून.
......
बसस्थानकात गाडी लावा, आत जा. शिवाय त्याची गाडी लागलेली असणार. मला कंटाळा आला. मी नाहीच म्हटलं. तसं त्याने माझ्या पाठीवर थाप मारली आणि हसत म्हणाला, जरा वेगळ्या कारणाने मुलीशी ओळख करून द्यायची मला तुझी.
मला नेमकं काही कळेना. मी संभ्रमात. त्याच्याकडे नुसता बघू लागलो.
तो म्हणाला, तुझ्या लक्षात नाहीयेय का काही?
नाही रे. लक्षात नाही आलं. काय विशेष?
तुम्ही तेव्हा काय काय म्हणत होतात, बोलत होतात मला. बाकीचे कुणी भेटले नाहीत अशात, तू बरा भेटलास. तुला दाखवलं पाहिजे ना, मला लेकरंबाळं असल्याचं. एक मुलगी आणि एक मुलगाही आहे.
अरे, पण मी कधीच तसं काही म्हणायचो नाही...
माहितेय मला; पण तू लिहिलंस ना. भले नाव बदललं असशील.
नंतर मग स्वत:च जोरजोरात हसत म्हणाला, अरे एवढा काय गंभीर झालास? गंमत केली रे. उलट तेव्हाचा काळ मजेशीर होता. त्या वयात तसं चालायचंच. मीही चिडवायचोच ना कुणाला तरी काहीतरी.
....
गोष्ट घडून गेली होती, विसरून गेली होती; पण त्याच्या डोक्यात मात्र होती. तरीही त्याच्या बोलण्यात विषाद जाणवत नव्हता. मी मात्र लाजीरवाणा झालो.
च्यामारी, दुस-याचं खापर फुटायला नेमकं आपणच का गठतो कायकी?
.....
एक खरै की, स्वत:वर विनोद करण्याचं, स्वत:चीच टर उडवण्याचं बळ आपल्याला ज्या गोष्टीतून मिळत असतं, त्याला अशी भेट कारणीभूत असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा