अण्णांची रेघ!
कॉलेजचा काळ. वैजापूरहून औरंगाबादला यावं लागायचं. मग सन्मित्र कॉलनीत, दै. मराठवाड्याच्या कार्यालयात चक्कर मारणं हे ओघानं आलंच. कार्यालयात शिरताना, तिथल्या संपादकीय विभागात जाताना काहीतरी वेगळंच वाटायचं. स्वत:तच फुगून यायला व्हायचं.
अनंतराव भालेराव या नावाचं प्रचंड आकर्षण होतं. त्यांना पाहावं असं तीव्रतेने वाटायचं; पण योग नव्हता आणि पोचही नव्हती. तेव्हा ते कार्यालयात येत नसत. बहुतेक घरूनच अग्रलेख पाठवत. एक ना एक दिवस ते दिसतीलच या आशेने कॉलनीच्या दुस-या टोकाकडे जायचं. उजव्या बाजुला त्यांचं घर लागायचं. घर जवळ यायला लागलं की, अंग थरथरून जायचं. पाय लटपटायला लागायचे. आपण कोण कुठले, त्यांच्या घरासमोरून जायचं धाडस करतोय असं काहीसं वाटत राहायचं. त्यांच्या घरावर त्यांच्या नावाची एक पाटी होती. ‘अनंत भालेराव’ असे अक्षरं लिहिलेली. साधी सुटसुटीत. त्या नावाखाली एक तिरपी रेघ होती.
दुर्दैवाने अण्णा बाहेर कधीच दिसले नाहीत. त्यांना जवळून पाहण्याची संधी कधीच मिळाली नाही. पण ती पाटी मात्र कित्येक वर्ष न चुकता मी पाहात आलो. त्यांचं घर आता तिथे नाही; पण ती पाटी मात्र आजही जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोर आहे. आजही त्या रस्त्याने जेव्हा केव्हा जातो तेव्हा मला नवं काही दिसतच नाही, तेच जुनं घर आणि त्यांच्या नावाची तीच पाटी हटकून दिसत राहते. फक्त आता थरथरायला होत नाही एवढंच.
.......
काही वर्षानंतर जेव्हा मी माझ्या घरासमोर नावाची पाटी लावली तेव्हा नावाखाली तशीच तिरपी रेघ मारून घेतली. पोस्टमन किंवा इतर येणारांना माझ्या नावाची पाटी दिसत असली तरी मला मात्र त्याखालची रेघच अधिक ठळक दिसते. ती रेघ अण्णांची रेघ आहे, माझ्या मनात कायमची कोरली गेलेली. अनंतराव पुन्हा होत नसतात; पण मराठी पत्रकारितेत गावखेड्यापर्यंत त्यांच्या रेघेचा जो ठसा आहे, त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न तर आपण करू शकतो!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा