खाण्याची रेसिपी


काही भाजा अशा असतात की, त्यांचा थाटच केला पाहिजे. त्यांना राजासारखी वागणूक दिली पाहिजे, भले मग आपल्याला काही गोष्टीत कमीपणा घ्यावा लागला तरी चालेल. नजरेला मोहवून टाकणारा त्या भाजीवरचा तवंग आपण तलम रेशमी वस्त्रासारखाच बघितला पाहिजे. कढईतल्या तर्रीत दिसणारी त्यावरची भरजरी कलाकारी फिल करता आली पाहिजे.
ही भाजी आपण ज्या पात्रात घेवू, ते पात्र ताटात ठेवताना इतर कुणीही उपटसुंंभ ताटात असता कामा नये. ताटातलं आख्खं मैदान केवळ आणि केवळ त्या पात्रासाठी राखीव असलं पाहिजे. ते फारच एकटं पडलंय असं वाटत असल्यास त्याभोवती पुरक म्हणून कांदा-लिंबूची रांगोळी काढावी.
भाजीचं पात्र एकदा ताटात विराजमान झालं की त्यासोबत आपण जे काही भाकरी वगैरे घेवू ती हातातच धरली पाहिजे. तिला त्याच ताटात ठेवणे किंवा तिच्यासाठी स्वतंत्र ताट घेणे हे भाजीसाठी उद्धटपणाचे आणि अवमानकारक वर्तन असते. भाकरी वगैरे तत्सम गोष्टी या कॉमन असतात. कायम ताटात बसून त्याही कंटाळलेल्या असतात. किमान अशा वेळी त्यांना हातात ठेवल्यास आपल्या हाताची उब लागून त्यांनाही जरा चेंज वाटायला लागत असतो. भाजीच्या सन्मानासाठी आपण हे करत असतो, त्यामुळे ‘एकाच हाताने खावे वगैरे’ संस्कारबिंस्कार आड येत असतील तर ते त्वरित उडवून लावायचे असतात.
तर एका हातात ती भाकरी वगैरे घ्यायची, दुस-या हाताने तिचा तुकडा तोडायचा आणि मग तो हात भाजीच्या दिशेने धिमे धिमे न्यायचा...
अशावेळी बिलकुलच उतावीळ न होता, त्यातल्या वांग्यांचा आदब राखायचा, नसता बैंगनराजाच्या जिरेटोपातील काटा गहरा दंश करू शकतो. शाकाहारी गोष्टी अशा वेळी हिंस्त्र बनत असतात, हे लक्षात घ्यावे. तर त्या वांगेमहाशयांना हळूवार हातांनी जरा रश्श्यात खेळवायचं, त्या तवंगाचा स्वाद आधी त्यांना घेवू द्यायचा. ते घुसळून निघाले की, खुश होतात आणि मग आपसूकच नम्र आणि नरम होतात. हा सगळा सोपस्कार नीट पार पडला की, पुढचं राज्य तुमचंच असतं.

टिप्पण्या