रेडिओ आणि दीर्घायुष्य

माझ्या ओळखीत नव्वद ते पंच्चाण्णव वयोमान असलेल्या दोन आज्ज्या होत्या. अगदी ठणठणीत प्रकृतीच्या. एक इथल्या घराशेजारी आणि गावाकडच्या घरासमोर. दोघींत एक समानगुण होता, तो म्हणजे दोघीही रेडिओ ऐकायच्या. ठराविक वेळेला त्यांच्या घरातून तो आवाज माझ्यापर्यंत यायचा. तो नेम कधीच चुकला नाही. त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य रेडिओच असणार असं मला नेहमी वाटतं.
अगदी अलीकडच्या काळात दोनपाच वर्षांच्या अंतराने त्या दोघीही गेल्या. अर्थात मग बातम्यांचा-गाण्याचा तो आवाजही बंद झाला. कधीतरी असाच दूरवरनं रेडिओचा आवाज आला की, मला हमखास त्या दोघींची आठवण येते. खरं तर त्या असतानाच टीव्ही येवून अनेक वर्ष झाली होती. अगदी रामायण, महाभारतसारख्या धार्मिक मालिका जावून टीव्ही पुढेही सरकला होता; पण त्यांचा जीव रेडिओतच!
या उलट माझ्या सासूबाईंचं होतं. त्यांना टीव्ही प्रचंड आवडायचा. त्या खरे तर सिनेमाच्या शौकिन. त्यांनी भरपूर सिनेमे पाहिलेले. पण एकदा त्या पडल्या आणि त्यांचं ऑपरेशन ठरलं. वय ऐंशीच्या जवळपास. डायबेटिस, बीपी शिवाय पार्किन्सन झालेला. त्यावेळी ‘थ्री इडियट’ सिनेमा आला होता. त्याची खूप चर्चा होती. त्यांना तो सिनेमा पाहायचा होता. त्या यातून ब-या होतील की नाही याची आम्हाला काळजी होती; पण त्या नीट झाल्या आणि त्यांनी तो सिनेमा घरी का होईना पाहिला.
पुढे त्यांना बाहेर पडणे मुश्किल झाले, त्यांनी मग आपली तहान टीव्हीवर भागवली. बहुतांशी मराठी मालिका त्या पाहायच्या. अधून मधून काही हिंदी आणि तेलगुही. तोच त्यांना एक विरंगुळा होता. कधीकधी मग आम्हीही त्यांच्यासोबत मालिका पाहायचो. नव्या काळात बेडरिडन व्यक्तींसाठी टीव्ही हे एक वरदानचै. फारच एकटेपणा जाणवायला लागतो, तेव्हा या मंडळींना टीव्हीत रमायला बरं वाटतं. मालिकातल्या संसारात त्या मिसळून जातात. पुढे काय होणारै यासाठी त्यांना दुस-या दिवसाची वाट असते.
आता नेमकी कुठली मालिका आठवत नाही; पण सासूबाईंची तब्येत अधिकच बिघडली तेव्हा ती मालिका संपायला अवघे काही दिवस बाकी होते. शेवटाची उत्कंठा वाढवत नेली होती. आम्हालाही डॉक्टर म्हणाले, आता फार दिवस नाहीत. मग राहून राहून आम्हाला वाटायचं, मालिकेचा शेवट त्यांनी बघावा आणि नंतरच डोळे मिटावेत. गेल्याचं दु:ख प्रचंड असतं; पण त्यात अशा छोट्या गोष्टीही रुतून बसलेल्या असतात.

टिप्पण्या