पाण्या अभावी
आज सकाळी सकाळी किचनच्या खिडकीतून बाहेर पाहिलं आणि एकदम चर्रर्र झालं. कुंडीतल्या चाफ्यानं मान खाली झुकवली होती. कुणीतरी वाकून याचना करतंय अशी त्याची देहबोली. त्या फांदीवरची दोन फुलं आणि वाळून स्वत:भोवती मिटून गेलेली पानं फारच केवीलवाणी दिसत होती, जणू ते मला पाणी मागतायेत. टचकन पाणीच आलं डोळ्याला.
वाचवलेलं पाणी आणि साचवलेलं खरकटं पाणी असं सगळं मिळून कुंड्यांना टाकतोये; पण दुपारपर्यंत कुंड्या कोरड्या पडताहेत. उन्हाचा तडाखा एवढाये की, पानं जळून चाललीयेत.
पानगळीत गळणारी पानं आणि उन्हाच्या तडाख्यात अकाली जळून गळून जाणारी पानं यांतला फरक या उन्हाळ्याने चांगलाच शिकवलाय. पानं पिवळी पडतात आणि गळून जातात, निसर्गनियमानं. त्या तुलनेत उन्हानं तळपून गेलेली पानं हिरव्यात असतानाच अकाली मुरगळून पडतात. या पानांचा जगण्याचा शेवटचा संघर्ष त्यांच्या आकारात दिसत राहतो.
या उन्हाळ्यात माझ्याकडे पहिला बळी गेला तो मुसांड्याचा. एरवी तो माझ्याकडे नाखुशच होता. खूपदा प्रयत्न करूनही तो येत नव्हता. दोनतीन रोपं गेल्यानंतर हा कसाबसा दोन वर्ष टिकला, यंदा तो एप्रिलातच सोडून गेला. लाल आणि पांढरा इझोराही झडून गेला आहे, पण पावसाळ्यात फुटून येण्याची शक्यता वाटतेय. आयस्क्रिमची छाटणी केली होती, तेव्हापासून त्याला पालवीच फुटलेली नाहीयेय. घंटीच्या केशरी फुलांनी परिसर प्रसन्न वाटायचा, त्याचा पसारा आता अंतर्धान पावलाय. अनंताच्या नुस्त्या बरगड्या राहिल्यात. बांबूला नुकतीच पालवी फुटली होती, तीही वाळून गेलीये; पण तो जगेल असे वाटते. लिंबाला यंदा भरपूर फुले आली होती, छोटी छोटी लिंबेही दिसू लागली होती; पण त्यांची वाढ अचानक थांबलीये. पावसानंतर ते रसाळ होतील असं वाटतंय. यंदा सोनचाफा रुसलेलाच होता. त्याला फुले आली तीही तब्येतीनं खालावलेली. त्याची पानं गेलीयेत सारी; पण फांद्यांना कुठेमुठे हिरवं दिसतं आहे. तो जगेल. कुंदा, काकडा, जुई, रातराणी, जास्वंद यांच्याकडे बघवत नाही; पण एखाद्या पावसात ते पुन्हा बहरून येतील अशी आशा आहे. या सगळ्या पाश्र्वभूमीवर आपलं सौदर्य टिकवून आहे ती फक्त बोगनवेल. तिच्या काट्यांपासून सूर्यदेवही जरा दूर राहात असावेत.
वरूणराजा, दादा ये राव आता. किमान झाडाझुडपांसाठी तरी एक शिडकावा.. प्लीज....!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा