ग्रेस, भूपेनदा वगैरे..

खूपदा ग्रेस यांची कविता न समजो; पण मी त्यांच्या रचनेच्या, शब्दांच्या प्रेमात पडतो. त्यांची एक कविताये, त्यात ‘मुलतानी’ रागाचा उल्लेख आहे. ‘कंठात दिशांचे हार निळा अभिसार वेळूच्या रानी, झाडीत दडे देऊळ गडे येतसे जिथून मुलतानी.’ ही ओळ ऐकताना, वाचताना दूरवरनं येणा-या रेडिओच्या आवाजासारखंच मला फिलिंग यायचं. माझं आणि संगीताचं कधी जमलं नाही. त्यामुळे रागदारी वगैरे तर फारच दूर. नंतर ‘साजणवेळा’ची कॅसेट आली आणि ती वारंवार ऐकताना ही ओळ मनात अधिकच घर करू लागली. तशातच म. वा. धोंडांचं मर्ढेकरांच्या कवितेचा शोध घेणारं पुस्तक वाचलं होतं. वाटलं, आपल्याला जे रेडिओचं फिलिंग आहे ते बघूयात, एकदा मुलतानी काय आहे हे ऐकुयात. कदाचित हा राग आपल्याला जवळचा वाटू शकेल, तो प्रत्यक्ष ऐकल्यावर आपल्याला काही तरी वेगळं अनुभवायला मिळेलही. कविताही अधिक उलगडेल.
तेव्हा स्मार्ट फोन नव्हता. मग त्यासाठी ‘मुलतानी’चा शोध घेतला. एक मित्र आहे न्यायाधीश म्हणून, त्याची बायको भारती संगीत क्षेत्रातली. त्याच्याकडे चौकशी केली. त्याला सोबत घेवून मग आम्ही कॅसेटची दुकानं पालथी घातली. एके ठिकाणी मिळाला, भीमसेन जोशींचा मुलतानी.
ऐकला; पण मला ग्रेसच्या ओळी ऐकताना जे डोळ्यासमोर यायचं तसं त्यात बिलकुलच काही नव्हतं. ग्रेसना वेगळी अनुभूती असेल; आपली तेवढी कुवत नाही म्हणून मग ती गोष्ट सोडून दिली; पण नंतर ती ओळ ऐकताना, वाचताना मला जो आनंद द्यायची तो देईनाशी झाली. ती कविता आजही आवडते; पण आधीचं फिलिंग जे गायब झालं ते झालंच.
यातून एक कळालं की, कवितेतून आपल्याला काय मिळतंय ते घ्यावं; पण तिच्या शोधात फार जावू नये. कवीच्या आणि आपल्या अनुभवात, आकलनात भरपूर फरक असू शकतो. त्यानं लिहिताना तो आनंद घ्यावा, आपल्याला वाचताना जो आनंद मिळतो तो आपण घ्यावा. उगाच ते टॅली करण्याच्या फंदात पडू नये. मनाशीच मग म्हटलं, आपल्याला अजून सुगममध्येच फारसं काही कळत नाही, कशाला रागदारीच्या फंदात पडायचं?
.......
या उलट भूपेनदाच्या गाण्याबाबत झालं होतं. ‘रुदाली’नंतर मी भूपेनदाच्या आवाजाच्या प्रेमात पडलो. खरं तर मी गाणे लावून ऐकत बसलोय असं कधी होत नाही, सिनेमात गाणं सुरू झालं की, उठून जाणा-या मंडळीपैकी मी एक; पण ‘रुदाली’तली गाणी मी खूपदा ऐकली. आवाजाचे काही पोत माणसांना वेडावून टाकतात. भूपेनदामुळे ‘रुदाली’ तलं ‘दिल हूम हूम करें...’ हे लताबाईंच्या आवाजातलं गाणंही मला प्रचंड आवडू लागलं. तेच गाणं एकेदिवशी बायकोच्या तोंडून ऐकल्यामुळे मी तिच्या प्रेमात पडलो होतो. परिणामी आमचा जो काय भलाबुरा संसार आहे याला भूपेनदा जबाबदार आहेत, असंही आम्ही गमतीने म्हणतो आणि रोजच्या जगण्यात कधी त्यांना शिव्या देतो, कधी आभारही मानतो.
तर भूपेनदाच्या ‘डोला रे डोला’ तली गाणी ऐकताना द-याखो-याचा, वनराईचा, चहाच्या मळ्यांचा मला भास व्हायचा. तो आवाज ती सफर घडवून आणायचा. त्याच्या खूप वर्षांनंतर मी जेव्हा अरुणाचल प्रदेशात गेलो तेव्हा, आसाममधून जाताना जे काही दिसलं ते सारं मला भूपेनदाच्या गाण्यात पूर्वी पाहिल्यासारखं जाणवत राहिलं. त्या भागात उंचावरनं जाताना, खालच्या बाजूने दिसत असलेले ढग पाहताना कायम भूपेनदा आठवत राहिले. पुढे तिच अनुभूती मला मोहित चौहानच्या गाण्यात येवू लागली.
बस्स,
कविता, गाणं यातलं फार न कळणा-यांचं पण त्याबद्दल काहीतरी चिंतन असतं, एवढंच! बाकी नंतर!!

टिप्पण्या