न ऐकणा-याची डायरी
आमच्या घराच्या भिंतीना नाट्यगीते, हिंदी मराठी भावगीते वगैरे ऐकायची सवये. हॉलमधल्या भिंतीचे कान तर ‘निर्भय, निर्गुण...’ ने तयार झालेले. मुलगा शाळेच्या शेवटच्या टप्प्यावर आला आणि काही दिवस या भिंतीवर लिंकीनपार्क, बॅकस्ट्रीट बॉइज वगैरे सारखी मंडळी हजेरी लावू लागली. नंतर तर थेट ‘मेटल’वाले ठोश्या मारू लागले. त्याही नंतर डेथमेटल वगैरे थेट घशातून खर्रर्र गाणारे गायक आल्यावर मग त्याला म्हटलं, दादा, जरा आवर त्यांना.
त्याने मग हेडफोन लावून ऐकायला सुरूवात केली. मात्र एकेदिवशी चुकून त्याने हेडफोन लावलाच नाही. तो ऐकत असलेल्या अल्बममधून अचानक एक फिमेल व्हाईस आला आणि मी जागच्या जागी थिजून गेलो.... अंगावर काटा आला आणि प्रचंड वेगळंच काही तरी वाटू लागलं. कुणा देवतेचा स्वर्गिय आवाज असावा असा. मी त्याला ते पुन्हा पुन्हा रिवाइंड करायला लावलं आणि केवळ त्याच चार ओळी ऐकत राहिलो, अगदी डोळे बंद करून. त्यालाही आश्चर्य वाटलं. गाण्याचा नेमका अर्थ माझ्या कळण्यापलिकडे होता, त्याची गरजही नव्हती, कारण आवाजाचा पोत माझ्या आत खोलपर्यंत शिरला होता. तो अल्बम होता, एमिनमचा आणि गाणं होतं, द मॉन्स्टर. तो आवाज होता, रिहानाचा.
तिच्या आवाजाने मला काही काळ झपाटून टाकलं. तिचं मग ‘किकी डू यू लव्ह मी’वाल्या ड्रेकसोबतचं ‘वर्क वर्क वर्क..’ ही ऐकलं. शपथ, त्यातल्या कुठल्याच गाण्याचा अर्थ लावण्याच्या फंदात मी पडलो नाही. तिचा आवाज ऐकून माझ्या मनात एक आकृती तयार झालेली होती, ती नेमकी तशीच दिसते का हे पाहावे म्हणून मी तिचा व्हिडीओ पाहिला. ऑडिओच ऐका, असं मुलगा का म्हणत होता, याचंही मग मला ज्ञान झालं.
खरं तर माझा या गायकांशी आणि गाण्याशी संबंध येण्याचं काही कारण नाही. तसेही इंग्रजी पुस्तके, गाणे माझ्याकडे रमत नाहीत, त्या भाषेशी मला फारसं जुळवून घेता आलेलं नाही; पण संगीताला भाषा नसते म्हणतात. मग नव्या पिढीमुळे बिनभाषी संगीत शिरतं काही काळ आपल्यात. एरवी भूपेनदाचं ‘बिस्तिर्ण दुपारे..’ हे बंगाली आणि आसामीत अर्थ न लावताच ऐकत होतोच की. मग लेड झॅपलीनचं ‘डाऊन बाय दी सी साईड’, बॉब मार्लेचं ‘बफेलो सोल्जर’, बॅकस्ट्रीट बॉइजचं ‘नेव्हर गॉन’ वगैरेंसारख्या गाण्यांनी मला तेव्हा खिळवून ठेवलं. ‘नेव्हर गॉन’ने तर शाळेतल्या निरोप समारंभात नेलं.
.......
लेड झॅपलिन बँडच्या सन्मानार्थ वॉशिंग्टनच्या केनेडी सभागृहात एक कार्यक्रम झाला होता. त्याचा व्हिडीओ मला बघायला मिळाला. त्या बँडचे सगळे वयस्कर सदस्य समोर बसलेले, प्रेक्षकांत मिशेल, बराक ओबामा वगैरेसारखी बडी मंडळी बसलेली. लेड झॅपलिनच्याच ‘स्टेअर वे टू हेवन...’ गाण्याचं अॅन आणि नॅन्सी विल्सन या भगिनींनी केलेलं सादरीकरण. एक बहिण गातेय, दुसरी गिटारवर आहे. बँडच्या मृत सदस्याचा मुलगा ड्रमवर आहे.... कॅमेरा विल्सन भगिनीवरनं मधूनच बँडच्या वयस्कर सदस्यांवर जातो....त्यांच्या डोळ्यातले नेमके भाव आपल्यापर्यंत पोहोचवतो.....त्याचा शेवट तर अंगावर शहारे आणणाराच, डोळ्यात टचकन पाणीच येतं. कितीदा हे पाहिलंय आणि पुढे कितीदा हे पुन्हा पुन्हा पाहू सांगता येणार नाही...
मुलगा शिक्षणासाठी बाहेर पडल्याने आता हे गायक घरी फारसे फिरकत नाहीत; पण त्यातले काही मनात असे पक्के रूतून आहेत, अर्थापलिकडचे.
प्रपंच यासाठी की, परवाच, ‘ओ गंगा तुमी...’ ही भूपेनदाची रचना निरनिराळ्या गायकांच्या आवाजात ऐकत असताना, पुरबी मुखोपाध्यायच्या आवाजातलं ‘ओल्ड मॅन रिव्हर...’ सापडलं. डेंजर डोक्यात शिरलाय आवाज. खरं तर त्याच्या तासभर आधी इमान चक्रवर्तीच्या आवाजातलं बंगाली व्हर्जन आवडून गेलं होतं; पण मग पुरबीनं तिन्ही भाषेतला खजाना उघडा केला. काय काय ग्रेट आवाजैत आपल्याकडे!
कानं असणा-या भाषिक माणसांची दाद एकवेळ सोपी; पण ठार कानांच्या लोकांना प्रेमात पाडणं सोपं नसतं!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा