गावाकडचा हात मोठा असतो!

गावाकडं थंडी जबरा सुटलीये. मित्राच्या दारापुढे रस्त्यावर खुच्र्या टाकून उन्हाला बसलोय. त्याची आईही आहे. आसपास खेळणारा त्याचा छोटा, गोरागोमटा नातूही आहे. गप्पात जुनंपानं काहीतरी निघतंय. तेवढ्यात काकू म्हणतात, भऊ कधी जाणारैस परत. मी म्हणतो, तासाभरात निघेल. बरं, मग जरा थांब असं म्हणून काकू लगबगीनं आत जातात आणि काही वेळात मिरच्याचा ताजा झणझणीत ठेचा घेवून येतात. त्यांनी सोबत देण्यासाठी तेवढ्या वेळात तो केलेला असतो.
......
काकूच्या हातचा ठेचा माझा विकपॉइंंटै. खरं तर तो नॉस्टेल्जियाये. सहावी ते दहावी अशा शाळकरी वयात आम्ही या ठेच्याचा खूप लाभ घेतला आहे. त्याने आम्हाला मधल्या सुटीची वाट पाहायला लावली आहे. शाळेपासून सगळ्यात जवळ या मित्राचं घर. मधली सुटी झाली की, आम्ही तडक त्याच्या घरी यायचो. काकू सकाळी स्वयंपाक करून शेतात गेलेल्या असायच्या. भाकरी आणि ठेच्याची दुरडी त्यांनी शिंक्यावर ठेवलेली असायची. ती खाली उतरवली की आम्ही त्यावर तुटून पडायचो. त्याची चव आजही जिभेवर रेंगाळून आहे. नंतरचा आम्हा मित्रांचा हाशहुशचा तो सामुहिक कोलाहलही आपला ताल टिकवून आहे. पाण्याचे ग्लासच्या ग्लास रिकामे करून मग आम्ही शाळेची वाट धरायचो. किंवा बहुतेकदा शाळेला दांडी मारून गु-हाळात जायचो.
सुरुवातीच्या काळातली एखादी चव अशी पक्की असते की नंतर शेकडो चवी येवोत, पहिल्या चवीची तोड कशास नसते. तेच माझं ठेच्याच्या बाबतीत झालंय. अलिकडे मानवत नाही म्हणून त्या ठेच्यात कोथिंबीर, कूट वगैरे टाकून त्याला भलतं सौम्य केलं जातं, तरी मिरच्या लवंगी नसून पोपटी असतात.
गण्या, तिरम्या, पक्या आणि मी असे आम्ही चौघं एकाच गल्लीत आणि एकाच वर्गात होतो. गण्या डॉक्टर झालाय. पक्या नाहीयेय आता. तर त्यातला तिरम्या म्हणजे आताचा हा त्रिंबकनाना पवार. प्रगतीशील शेतकरी. स्वातंत्र्यसैनिक भगवंतराव पवार यांचा तो मुलगा. त्यांचं नाव पंचक्रोशीत आदराने घेतलं जायचं. त्यांचं निधन झालं तेव्हा त्रिंबक लहान होता. काकूनी प्रचंड कष्टाने त्यांच्या पश्चात घर उभं केलं. तेव्हा ते दोघं एका छोट्या खोलीत राहायचे. दारासमोर नालीलगत एक लालदगड ठेवलेला असायचा. अनेकदा सकाळी त्रिंबक त्या दगडावर आंघोळ करत असायचा आणि त्याच्या पायरीवर आम्ही त्याचं आटपायची वाट पहात बसलेलो असायचो. त्याच्या पायात चांदीचा वाळा होता.
पुढे त्रिंबक बँकेत लागला आणि शेतीतही लक्ष घालू लागला. माझ्या घराला लागूनच त्याने आता तीन मजली टोलेजंग घर बांधले आहे. सुख पायाशी लोळण घेते आहे. मला मात्र डोक्यावर टोपलं घेवून शेतातून संध्याकाळी परतणा-या काकू आजही जशाच्या तशा आठवतात. आता त्यांच्या कष्टाचं चिज झालं आहे.
अलिकडच्या काळात थंडीच्या दिवसात गावाकडं जेवढ्या केवढ्या चकरा होतात, त्यात ठरलेली एक गोष्ट असते, ती म्हणजे काकूच्या हातचा मेथीचा भलामोठा लाडू. जितक्या वेळेस जाईन, तितक्या वेळेस तो सकाळी चुकत नाही. आपल्याकडचे चांगले दोन अडिच लाडू सामावून जावेत असा त्याचा अगडबंब आकार असतो. अगदी खाता खाता थकून जावं असा!
गावाकडचा हात मोठा असतो!
....
खूप दिवसांनी ठेच्याची आठवण निघाली आणि चाळीसेक वर्षापूर्वी होता तसाच, त्याच चवीचा ठेचा असा पुढ्यात आला. तेव्हा होती तशीच कुडकुड थंडी, तेच कोवळ उन. बस्स, इथून मागच्या बाजुला फर्लांगभर अंतरावर तीच शाळाये, जावं म्हणतोय!

टिप्पण्या