मोठं घर... आणि आठवणींंचा केसर!
... तर मोठ्या घरून केसरची पेटी आली. ती येतंच असते दरवर्षी न चुकता.
मोठं घर, अलिकडच्या काळात हे घर टोलेजंग झालेलं असलं तरी ते जेव्हा दोन अडिच खोल्यांचं होतं तेव्हाही ते मोठं घर म्हणूनच मानलं जायचं. तो मान होता. मोठं घर हे घर नव्हे तर एक नातं असतं. नातलगांमध्ये अशा मोठ्या घराचं एक वळण पडून गेलेलं असतं.
तुमच्याकडे लग्नाची बैठक वगैरे असो किंवा तत्सम कुठलंही कार्य असो, शेत-जमीनीची खरेदी-विक्री असो, शिक्षण-नोकरीसंदर्भातील काही निर्णय असो या मोठ्या घराला विचारून ठरवण्याचा पूर्वी एक रिवाज होता. मोठ्या म्हणवल्या जाणा-या त्या घरालाही तेवढा अनुभव आणि जाण असायची. विचारपूर्वक त्यावर निर्णय व्हायचा. त्या घराचा सल्ला बहुतांशी लाभदायकच असायचा. जरा हुकला तर तो निभावून नेण्याची, त्यात मार्ग काढण्याची ताकद त्यांच्यात असायची. काळाच्या ओघात ही पद्धत कमी कमी होत गेली. मोठं घर ही संकल्पनाच मोडीत निघाली. सगळे स्वतंत्र झाले. जो तो आपल्या पद्धतीने निर्णय घेवू लागला, नंतर सांगू लागला. ते साहजिकही होतंच; पण तरीही काही प्रमाणात का होईना ते काही ठिकाणी अंशत: टिकून आहे.
....
आण्णासाहेबांचं घर हे आमच्यासाठी मोठं घर होतं. वडिलांच्या लहानपणीच आई गेली. नंतर लगोलग त्यांचे वडिलही. घराची वाताहात झाली. सगळी भीस्त मामा आणि मावशांवर. वेरूळला एक आणि गावाच्या जवळच लोहगावला एक त्यांची मावशी होती. त्यातल्या लोहगावच्या मावशीचा थोरला मुलगा म्हणजे आण्णासाहेब. त्यांचा छोटा भाऊ रावसाहेब हे वडिलांचे समवयस्क. त्यामुळे नातं कमी मैत्री अधिक. बिनाआईचा लेक म्हणून मावशांचा वडलांवर भारी जीव.
वडलांचे सख्खे मोठे भाऊ दादासाहेब हैदराबादला पुढच्या शिक्षणाला गेले. पुढे ते तिकडेच स्थायिक झाले. उस्मानिया विद्यापीठात मराठीचे विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. ते एक मोठं घर होतं; पण ते दूर. औरंगाबादेत आण्णासाहेबांचं घर होतं. ते शिक्षण क्षेत्रात मोठ्या हुद्यावर. एकूण बहिणभावंडांच्या घरातल्या निर्णयात आण्णासाहेबांचा सल्ला महत्त्वाचा मानला जात असे. बहुतांशी मोठ्या निर्णयासाठी त्यांचा आवर्जून विचार घेतला जात असे. त्यामागे विश्वासाचं एक मोठं वलय होतं.
......
अनेक लग्नकार्यात भावंडांतला जिव्हाळा, आदब आम्ही अनुभवला आहे. परस्परांचा मानमरातब ठेवून वागणूक असायची. मोठ्या भावाला आहोजाहोचे संबोधन होते. कुटुंब एकत्र नव्हती पण एकोपा प्रचंड होता.
आण्णासाहेब काही वर्षापूर्वी गेले. मागच्या वर्षीपर्यंत काकू होत्या. वडिल गावाकडून इथे आले की, पहिल्यांदा मोठं घर म्हणून त्यांच्याकडे जात. त्या गेल्या तेव्हा, आता मोठं घर राहिलं नाही म्हणून वडिलांची वेदना अधिक तीव्र होती. अर्थात त्यांच्या घरातली आताची पिढी ती गादी चालवतेय. खरं तर कौटुंबिक पातळीवर गादी बाईमाणसाच्या हातात असते. त्याच ती चालवत असतात. ती जाण, ती साथ महत्त्वाची असते.
......
आता दादासाहेब नाहीत, आण्णासाहेब नाहीत, रावसाहेबही नाहीत; पण वडिलांच्या आठवणीत त्यांच्यासोबतचे अनेक प्रसंग असतात. त्यांच्यामुळेच मी कसं घर घेवू शकलो, अमूक लग्न जमवण्यात त्यांचा कसा पुढाकार होता वगैरे वगैरे असंख्य गोष्टी असतात. त्याची सतत जाणीव राहिल्याने नंतरच्या पिढ्यांतही अद्याप ही घरं परस्परांना धरून आहेत, टिकून आहेत.
.......
आठवणी कधीच सूत्रबद्ध नसतात. त्या आल्या की एकदम ढिगाने येतात. एक आंब्याची पेटी काय आली आणि विषय कुठल्या कुठं गेला; पण त्यातली एखादी शाखच उतरलीये इथे. पाडाला आलेले खूप आंबे अजून बाकी आहेत, मागे!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा