ओ, दोरी सोडा
पेपरला ज्या दिवशी सुट्टी असते तो आख्खा दिवस माझ्यासाठी सुन्न करणारा असतो. त्या दिवशी मला काही सूचत नाही. काही करावं वाटत नाही. पेपर टाकणा-या पो-याची तीव्रतेने आठवण येत राहते. पेपर आला किंवा नाही याच्याशी मला फार काही देणेघेणं नसतं. पण पेपरवाला न येणं हे माझ्यासाठी अस्वस्थतेचं कारण असतं. हे अलिकडच्या दोनेक वर्षातच जडलेलं दुखणं आहे.
बरं, हा पेपरवाला माझा नाहीये. माझ्याकडे तो पेपर टाकत नाही. मी त्याला पाहिलेलंही नाहीये; पण त्याचा आवाज मात्र माझ्या डोक्यात घर करून आहे. हा पो-या शेजारच्यांकडे पेपर टाकतो. हे शेजारी चौथ्या मजल्यावर राहतात. त्यांच्याशेजारच्या बंगल्यात मी तळमजल्यावर राहतो.
सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान हा पेपरवाला येतो.
माझ्या घरासमोरूनच तो जात असावा. सायकलवरनं जाताजाता चौथ्या मजल्याच्या दिशेने तोंड करून तो ‘ओ, दोरी सोडा’ अशी दणकेबाज आरोळी देतो. त्याची आरोळी आजूबाजूच्या सगळ्या घरात पोहोचून पलीकडच्या गल्लीतही जाते. मग वरून दोरी खाली येते. त्याला पिशवी बांधलेली असते.
या पो-याला पुन्हा पुन्हा आवाज द्यावा लागत नाही. एका हाळीत त्याची सूचना बिनादोरीची वर चढते आणि शेजा-याच्या घरात शिरते. पो-याचा आवाज खालून वरच्या दिशेने जात असला तरी त्याला पौराणिक गोष्टीतल्या आभाळातून आकाशवाणी होण्याचा फिल आहे. त्यामुळे तो दिवसभरात एकदाच ऐकायला मिळतो. तो ऐकल्याशिवाय दिवस सुरू झाल्याचा फिल येत नाही. परिणामी सकाळची ही वेळ मला चुकवता येत नाही.
तर या आवाजाची मला प्रचंड सवय झालेली आहे. सकाळी लौकर उठून मी या आवाजाची मनापासून वाट पाहत असतो. त्या वेळात कुणी आपल्याकडे येणार नाही याची तजवीज मी केलेली असते. एवढेच नव्हे तर अलिकडे मी बाहेरगावीही मुश्किलीने एखादा दिवस राहू शकतो. जिथे हा आवाज नाही तिथे सकाळच होत नाही असे विचित्र मला वाटू लागते.
सुरूवातीच्या काळात हा आवाज माझ्या अंगावर यायचा. एखाद्या नाजूक, सुंदर चित्रावर कुणीतरी शाई सांडल्यागत वाटायचं. एकदा तर मी बेसावध असताना हा आवाज आला आणि माझ्या हातातली बादली सुटून चक्क पायावर पडली. तात्पर्य असे की, या काळात मी कुठलीही जड वस्तू हातात धरत नाही. ‘दोरी सोडा’ कानात शिरले की, हातातले सगळेच काही सुटत जाते. ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्याच्याशी जुळवून घेणे अपरिहार्य असते. तर मी जुळवून घेतले. सांप्रतकाळी त्याच्या त्या ‘ओ’ मध्ये बसून ‘दोरी सोडा’ ही अक्षरे दिवसभर माझ्या घराभोवतीच्या हवेत रेंगाळत राहतात; पण मग पेपरबंदच्या दिवसाचे काय?
तर पेपर बंद असतानाच्या दिवशी ‘ओ, दोरी सोडा’ म्हणण्यासाठी कुणाला विनंती करावी काय या विचारात मी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा