स्वच्छता आणि न्यूनगंड

साफसुथ-या पाण्याचे प्रश्न जेव्हा उभे राहतात तेव्हा डेंग्युच्या डासांची मला तीव्रतेने आठवण येते. ते स्वच्छ पाण्यात निपजत असल्याचं इतकं डोक्यात ठसवलं गेलंय की, मला प्रचंड न्यूनगंड येतो. च्यायला, आपल्याला स्वच्छ पाण्याचं डासाएवढंही महत्त्व कळालेलं नाहीयेय, याचं वाईट वाटतं. त्याचं एडिस इजिप्ती वगैरे नावही मला प्रभावित करतं. शाळेत असताना पुस्तकात वाचलेला कुणी कुरळ्या केसांचा शास्त्रज्ञ पानातून बाहेर आल्यागत वाटत राहतं.
मग मी दुस-या बाजूनं जरा सकारात्मक विचार करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांचे आपण मनापासून आभारच मानले पाहिजेत याची जाणीव मला होते. आपल्याकडं स्वच्छ पाणी असतं तर किती रोगराई वाढली असती. ते नाहीयेय म्हणूनच आपण डेंग्यूपासून दूर आहोत हे कळायला मला वेळ लागत नाही. मग मला माझ्या शहराचा अभिमान वाटायला लागतो.
....
तरीही स्वच्छवाल्याचा अंतरिक राग म्हणून मग मी किरकोळ देशी डासांना न्यूनगंड द्यायचा प्रयत्न करतो. त्यातले दोन महाशय चक्क माझ्या संगणकाच्या स्क्रिनवर निवांत बसलेले असतात. स्क्रिन ही सुरक्षित जागा असते. त्यावर थाप मारून कुणी आपल्याला मारणं शक्य नाही याची त्यांना जाणीव असते. मला याची जाम चीड येते. अरे, स्वच्छ पाण्यात राहणे म्हणजे कुणाच्याही संगणकावर तंगड्या पसरून बसण्याचा परवाना नव्हे! मग मी त्यांच्या अंगाखालून अॅरो फिरवतो. त्यांच्या शेजारी खेटून कर्सर ठेवून एन्टर मारतो. टाईप करतो. तरी बहाद्दर हलायला तयार नसतात. अगदी आपल्या शेजारी अक्षरं जन्म घेताहेत, त्यांच्यातून शब्द आकाराला येतोय याबद्दल काडीचंही कुतूहल त्यांच्यात नसतं.
मग मी सारा मजकूर बाजूला सरकवतो आणि दोहोंच्या मध्ये एडिस इजिप्तीचा उल्लेख करून त्यांना डिवचतो. तरीही ते ढिम्म. बिलकुलच वर्गसंघर्ष नाही. जराही जलस नाही. दोघेही मजकुराकडे कानाडोळा करतात; पण त्यांना ते कळालेले नाही, असे नसते. कार्यक्रमातून सटकण्यासाठी एक ट्रीक नेहमी वापरली जात असते. एकाने उगाच मोबाईल कानाला लावून बाहेर जायचं आणि मग दुस-यानेही हळूचकन सटकायचं, तीच ट्रीक ते माझ्यावर वापरतात. पहिल्यांदा एक उडतो. दुसरा माझ्या नकळत उठून जातो.
मी मजकुराशी नुसताच खेळत राहतो. ते गेल्यानंतर काही काळ संगणकावरची रिकामी जागा मला अस्वस्थ करत राहते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा